नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरधाव अॅटोरिक्षा घंटागाडीवर आदळल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. हा अपघात तपोवन रोड भागात झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
विजय हरी गायकवाड (५० रा.वास्तूरंग सोसा.अष्टविनायक नगर,पेठरोड) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. गायकवाड गेल्या ८ जानेवारी रोजी तपोवन भागातून आपल्या अॅटोरिक्षातून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. तपोवन कॉर्नर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या घंटागाडीवर भरधाव अॅटोरिक्षा आदळली होती.
या अपघातात गायकवाड गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात अॅटोरिक्षाचेही मोठे नुकसान झाले असून याबाबत सागर जाधव (रा.मालेगाव स्टॅण्ड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार राजोळे करीत आहेत.