विजय वाघमारे, जळगाव
जळगाव – वाळूमाफियांनी उपजिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना तरसोद फाटा ते नशिराबाद दरम्यान मंगळवार, ६ रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात निवासी उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी विठ्ठल पाटील नामक एका संशयितास नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी रात्री अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, तहसीलदार विजय बनसोडे हे अन्य दोन जणांसह शासकीय वाहनाने (क्र. एम एच २८, सी ६४२१) गेले होते. त्यांना अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर दिसले. यापैकी एक डंपर न थांबता पुढे गेल्याने त्याचा पाठलाग करून त्याला जळगावच्या दिशेने परत आणण्यात आले. त्या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार हे शासकीय वाहनात बसलेले असताना सात ते आठ जणांनी थेट कासार यांच्यावर हल्ला चढवला. कासार यांच्यावर डोक्यावर लोखंडी रॉड मारल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भेट देत जखमी कासार यांची विचारपूस केली.
यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा दाखल !
विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा, गौतम पानपाटील,विठ्ठल पाटील,आकाश युवराज सपकाळे,योगेश उर्फ रितीक दिगंबर कोळी, अमोल छगन कोळी, संदीप ठाकुर,शिवकुमार इंगळे, अक्षय नामदेव सपकाळे (सर्व रा. जळगाव)
जाणून घ्या…अंगावर काटा आणणारा संपूर्ण घटनाक्रम !
उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 6 फेब्रुवारी रोजी रात्री 11.00 वाजता हे तहसीलदार विजय बनसोडे हे वाहन चालक नामे सुरेश महाजन व लक्ष्मण मनोरे यांच्यासोबत शासकीय वाहन क्रमांक (एम. एच. 28 सी. 6421) ने नशिराबादमार्गे भुसावळकडे अवैध वाळु वाहतुक करीत असलेले डंम्परवर कारवाई करण्यासाठी जात होते. यावेळी त्यांना तरसोद फाट्याजवळ त्यांच्या वाहनापुढे एक पिवळ्या रंगाचे (एम. एच. 19 बी.एम.9191) ही ट्रक वाळुने भरलेली भरधाव वेगात जात होती. कासार यांनी लागलीच डंम्परचा पाठलाग सुरु केला. थोड्याच वेळात नशिराबाद हायवे रोडवरील महेंद्र शोरुम जवळ थांबवुन डंम्परला थांबवून चालकास वाळू संदर्भातील रॉयलटीचे कागदपत्राबाबत विचारपुस केली. डंम्परची कागदपत्राची तपासणी करीत असतांना त्याठिकाणी काही लोक हे मोटारसायकल व कारने आले. त्यांनी कासार यांना नाव सांगून त्यांचा परिचय दिला. कासार बोलण्यात गुंतवून ठेवत डंम्पर जळगावच्या दिशेने पळवुन न्यायला सुरुवात केली.
टॉमीने मारहाण उपजिल्हाधिकाऱ्यांसह चालकालाही मारहाण !
कासार यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत डम्परचा पाठलाग सुरु केला. चालकाने डंम्पर हे तरसोद गावात जाणाऱ्या रस्त्यावर डंम्पर चालु स्थितीत जागीच सोडुन पळुन गेला. यावेळी कासार हे डम्पर चालक हा कुठे गेला?, हे पाहत असतांना रात्रीचे 11.30 वाजेच्या सुमारास 1) विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा नामदेव सपकाळे 2) गौतम पानपाटील 3) विठ्ठल पाटील 4) आकाश युवराज सपकाळे 5) योगेश उर्फ रिर्तीक दिगंबर कोल्हे (6) अमोल छगन कोळी 7) संदीप ठाकुर 8) शिवकुमार इंगळे 9) अक्षय नामदेव सपकाळे यांनी गैर कायद्याची मंडळी जमवुन प्राणघातक हत्यारनिशी कासार यांच्या अंगावर धावुन जात जिवे ठार मारण्याचे उद्देशाने लाथाबुक्यांनी रोडावर आडवे पाडुन मारहाण व शिवीगाळ केली. तसेच गौतम पानपाटील याने त्याच्या हातातील लोखंडी टॉमी डोक्यावर मध्यभागी मारली व डावे खांद्यावर, दोन्ही माड्यांवर टॉमीने मारहाण करुन दुखापत केली. तसेच मोबाईलदेखील टॉमीने फोडला. कासार यांना वाचविण्यासाठी चालक लक्ष्मण मनोरे हे आले असता त्यांना देखील टॉमीने हातावर मारहाण करण्यात आली. यावेळी कासार हे जिव वाचविण्यासाठी शासकीय वाहनात बसण्यासाठी गेले असता हल्लेखोरांनी शासकीय वाहनावर देखील हल्ला करुन तोडफोड केली.