नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट कागदपत्राच्या आधारे व तोतया व्यक्ती उभ्या करून भामट्यांनी भूखंडाची परस्पर खरेदी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईस्थीत मुळ मालकाने दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र यादवराव भामरे (रा.ओपेल इन्फू अपा.कर्मयोगीनगर), आनंद बद्रीनारायण भट्टड (रा.मौले हॉल मागे,सातपूर), प्रशांत श्रीराम बडगुजर (रा.सातपूर कॉलनी),प्रविण दत्तू भवर (रा.बॉईज टाऊन) व तोतया महिला व पुरूष अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत विनय यादवराव पंजाबी (रा. मालाड पूर्व मुंबई) यांनी फिर्याद दाखल केला आहे.
पंजाबी यांच्या आई वडिलांच्या नावे नाशिक महापालिका हद्दीत भूखंड होता. १३ जून २०१९ रोजी या भूखंडाची सह दुय्यम निबंधक कार्यालय वर्ग २ या कार्यालयात नोंदणी करण्यात आली. संशयितांनी पंजाबी यांच्या आई वडिलांचे बनावट कागदपत्र तयार करून या भूखंडाचा परस्पर खरेदी विक्री व्यवहार केला. याबाबत तोतया महिला व पुरूष उभे करून हे खरेदीखत नोंदविण्यात आले असून, सातबारा उतारा आणि फेरफारला त्याबाबत नोंदणी करण्यात आल्याने हा प्रकार समोर आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मन्सुरी करीत आहेत.