नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मद्यपान करत असताना किरकोळ कारणावरून बाचाबाची होऊन भांडण विकोपाला गेल्याने एकाने त्याच्याच मित्राच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी कामटवाडे येथील स्व. मीनाताई ठाकरे शाळेजवळ घडली. आनंद इंगळे (वय ३२) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. हे भांडण इतक्या विकोपाला गेल्याचे नेमकं कारण काय आहे हे मात्र पुढे आले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद इंगळे (रा. कामटवाडे) व संशयित आनंद आंबेकर (वय २८, रा. कामटवाडे) हे दोघे मित्र त्रिमूर्ती चौकातील एका हॉटेलमध्ये मद्यपान करीत असताना त्यांच्यात क्षुल्लक कारणातून बाचाबाची झाली. नंतर ते दोघेही कामटवाडे गावाजवळ आले. तेथे त्यांच्यात हाणामारी झाली. यावेळी संशयित आनंद याने मयत आनंद इंगळे याला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रसंगी मयत इंगळे याच्या डोक्यात संशयित आंबेकर याने दुभाजकांमध्ये पडलेल्या फरशीचे तुकडे घातले. त्यामुळे आनंद इंगळे हा गंभीर जखमी झाला.
परिसरातील काही नागरिकांनी याबाबत तत्काळ अंबड पोलिसांना माहिती दिली, तसेच जखमी असलेल्या आनंद इंगळे यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना आनंद इंगळे याचा मृत्यू झाला. मयत आनंद इंगळे याच्या पश्चात आई, वडील, बहीण व भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी संशयित आनंद आंबेकरविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, वसंत खतेले, नाईद शेख, योगेश शिरसाठ आदीसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच संशयितालादेखील ताब्यात घेतले. दरम्यान, आनंद इंगळे यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने या ठिकाणी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.