नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शस्त्रधारी टोळक्याने आरडाओरड करीत दहशत माजविल्याची घटना सिडकोतील शुभमपार्क भागात घडली. या घटनेत टोळक्याने एका चारचाकीची काच फोडून नुकसान केले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रणव हिरे, रवी चोर उर्फ पांजगे व शुभम पाटोळे अशी दहशत माजविणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत राहूल गुंजाळ यांनी फिर्याद दिली आहे. शुभम पार्क येथील गार्डनमध्ये दुचाकीवर आलेल्या संशयित त्रिकुटाने उभ्या असलेल्या चारचाकीची आरडाओरड करीत धारदार शस्त्राने काच फोडली.
यावेळी त्यांनी नागरीकांना शिवीगाळ करीत आमच कोणी वाकड करणार नाही, जर एखाद्याने पोलीसात तक्रार केली तर त्याची विकेट पाडून असे म्हणत परिसरात दहशत माजविली. या घटनेत कारची काच फोडून सुमारे आठ हजार रूपयांचे नुकसान केले असून अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.