इंडिया दर्पण वृत्तसेवा
मुंबई – उत्तर प्रदेश विधानपरिषद नियम समिती राज्याच्या अभ्यास दौऱ्यावर आली असून समितीने आज महाराष्ट्र विधानमंडळाला भेट देऊन महाराष्ट्र विधानपरिषद नियम समितीच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी विधानमंडळाची कार्यपद्धती, कामकाज याबाबत जाणून घेतले.
उपसभापती तथा नियम समितीच्या प्रमुख डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कामकाजाबाबत माहिती दिली. तसेच उत्तर प्रदेश विधानपरिषद नियम समितीचे प्रमुख बुक्कल नवाब यांनी उत्तर प्रदेश समितीच्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, महाराष्ट्र विधानपरिषद नियम 217 ते 219 अन्वये सभागृहातील कामकाजाची पद्धती आणि नियम यासंदर्भात आवश्यक त्या सुधारणा, नियमात बदल करण्याचे कार्य विधानपरिषद नियम समिती करीत असते. या समितीमध्ये नऊ सदस्य असून लोकसभेतील शून्य प्रहराच्या धर्तीवर विधानपरिषद सदस्यांना विविध विषय मांडण्याची संधी प्राप्त होण्यासाठी विशेष उल्लेख हे आयुध उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विनंती अर्ज समितीसंदर्भात सभापतींच्या अधिकारात विषय समितीकडे सुपुर्द करण्याचा झालेल्या निर्णयाबाबतची माहितीही त्यांनी दिली.
बैठकीत सदस्यांचे वेतन, भत्ते, पेन्शन, सुरक्षा, वैद्यकीय सुविधा, अनुपस्थितीसंदर्भातील उपाययोजना यावर चर्चा आणि माहितीचे आदानप्रदान झाले.
प्रारंभी उत्तर प्रदेश नियम समितीचे प्रमुख बुक्कल नवाब, सदस्य मुकेश शर्मा, लालबिहारी यादव, मुकुल यादव, हंसराज विश्वकर्मा यांचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत समिती सदस्य प्रा. राम शिंदे, महादेव जानकर, नरेंद्र दराडे, सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला. विधानमंडळाचे सचिव (2) विलास आठवले, उपसभापतींचे खाजगी सचिव रवींद्र खेबुडकर, उपसचिव ऋतुराज कुडतरकर, अवर सचिव सुरेश मोगल आदी उपस्थित होते.