जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमळनेर येथे शंभर वर्ष जूने तत्त्वज्ञान केंद्र आहे. त्याच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव शासनाकडे आल्यास त्याचा सकारात्मक विचार केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. ते मुंबई येथून दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संमेलनात सहभागी झाले होते. यावेळी संवाद साधतांना मराठी लोक साहित्याच्या संशोधन व ग्रंथ लेखनासाठी विशेष अनुदान देणार असल्याची, माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अमळनेर मराठी वाड्.मय मंडळाच्या वतीने आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा येथील प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर आज समारोप झाला. समारोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.रवींद्र शोभणे उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, शालेय शिक्षण व मराठी भाषा विकासमंत्री दिपक केसरकर, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, संमेलनाचे निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, पुणे विद्यापीठ सिनेट कौन्सिल सदस्य राजेश पांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दृकश्राव्य ऑनलाईन भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शासन महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षणबाह्य शासकीय, खासगी कार्यालयांमध्ये ग्रंथालय सुरू करण्याबाबत पावले उचलली आहेत. थोर साहित्यिकांच्या, संतांच्या तसेच ज्ञात अज्ञात लोकांनी लिहिलेल्या दुर्मिळ हस्तलिखितांच्या जतनासाठी विशेष प्रयत्न करून त्याबाबत प्रस्ताव मागविण्यात येणार आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणी साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून साहित्य संस्कृती भवन उभे करण्याची संकल्पना आहे. ज्याद्वारे जिल्ह्यातील साहित्याचा, कलेचा प्रचार प्रसाराला एक व्यासपीठ मिळेल. प्रकाशन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रंथयात्रा अर्थात ग्रंथ प्रदर्शन भरविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
साहित्य संमेलन ही आपली थोर परंपरा आहे. सांस्कृतिक विचारांची ही गंगा अखंड वाहते आहे. शंभराव्या साहित्य संमेलनाकडे वाटचाल करतो आहोत. १०० वे साहित्य संमेलन हे जागतिक स्तरावर नावाजले जाईल एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते आयोजित केले गेले पाहिजे. महाराष्ट्र शासन १०० व्या साहित्य संमेलनातही सर्वोतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, आपल्या समाजात साहित्यिकांचे स्थान हे कायम आदराचे व पूजनीय राहिले आहे. तरूण पिढीतही आता दमदार लिहिणारे लेखक तयार होत आहेत. साहित्य हा महाराष्ट्राचा वैचारिक प्रवाह आहे. केवळ तलवारी घेऊन लढाया करण्यापुरती आपली ओळख मर्यादित नाही. तर लेखणी घेऊन वैचारिकतेचं अधिष्ठान कागदावर मांडणारी अशी ही ओळख आहे. खान्देशात हा साहित्य सोहळा साजरा होत असतांना मराठी भाषेविषयी बोलतांना आपण केवळ प्रमाण भाषेचा विचार करुन चालणार नाही. मराठी भाषेत आपले वेगळे स्थान निर्माण करणारी आणि या परिसरातील अहिराणी, तावडी या बोलीभाषा तसेच वऱ्हाडी अन्य अशा आपल्या विविध भागातील बोलीभाषा आपल्या मायमराठीला श्रीमंत करतात हे ध्यानात घ्यावे लागेल. आज मराठी सोबतच अहिराणी भाषेतील गाणी समाज माध्यमांवरून जगभर पोहचली आहेत. त्यांना लोकप्रियताही मिळत आहे. याचे कारण म्हणजे आपल्या या बोलीभाषेतील गोडवा हा आहे. बोलीभाषांचा हा गोडवा प्रमाणभाषेच्या आणि इंग्रजीच्या अवास्तव आग्रहामुळे संपून जाऊ नये यावर यानिमित्ताने विचार व्हायला हवा. असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
अमळनेरला पुस्तकाचे गाव करणार – शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री दिपक केसरकर
शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले की, विदर्भातील साहित्य मंडळाला दहा कोटी रूपये देण्यात येणार आहेत. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात छोटी- छोटी संमेलने झाली पाहिजेत. वेगवेगळी संमेलन न भरविता सर्वांनी एकाच व्यासपीठावर राहणे गरजेचे आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी जे जे काही करता येईल. ते करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. परदेशात व भारतातील इतर राज्यातील मराठी शाळांच्या संवर्धनासाठी शासन काम करत आहे. साहित्य संमेलन हे शिखर संमेलन झाले पाहिजे. जिल्ह्यातील साहित्य संमेलनासाठी आवश्यक तेवढा निधी देण्यास शासन कटीबद्ध आहे. अमळनेरला पुस्तकाचे गाव करण्यात करण्यात येईल. साने गुरुजींना भारतरत्न पुरस्काराचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल. नियतकालिकांसाठी आवश्यक निधी साहित्य महामंडळांना देण्यात येईल. मराठी साहित्यिक व भाषिकांशी संवाद साधण्यासाठी वॉररूम तयार केला जाईल. या वर्षी कोणत्याही परिस्थितीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला जाईल. असेही त्यांनी सांगितले.
उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सार्वजनिक जीवनात आपल्या बोली भाषेत सातत्याने बोलणे आवश्यक आहे. केंद्र शासनाकडून महाराष्ट्रातील ग्रंथालयांच्या विकासासाठी ४७० कोटी रूपये दिले जाणार आहेत. आतापर्यंत विधानसभेत ६७ वेळा व विधानपरिषदेत ७० वेळा मराठी भाषेविषयी चर्चा झाल्या. वेगवेगळ्या माध्यमातील शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे.
संमेलनाध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्याची आपली परंपरा आहे. मात्र ही परंपरा सध्या लयाला जात आहे. अमळनेर व खान्देशच्या मातीतील माणसात एक सहृदयता आहे. प्रत्येकाला संमेलनाध्यक्ष सोबत फोटो काढण्याची भावना अतिशय महत्त्वाची आहे. आपले लक्ष आता शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाकडे लागले आहे. उषा तांबे म्हणाल्या की, पुढील संमेलनासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. त्यात छाननी केल्यानंतर २०२५ च्या संमेलनाचा निर्णय घेण्यात येईल.
डोळ्यांच्या शस्त्रक्रियेमुळे संमेलनात मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती
महाराष्ट्राच्या विकासावर बारीक लक्ष ठेवता ठेवता डोळ्यावर थोडा ताण पडल्याने डोळ्यांची दुरूस्ती करून घेतली. त्यामुळे इच्छा असून देखील प्रत्यक्षात याठिकाणी येता आले नाही, या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो. खरे तर सारस्वतांच्या मेळ्याला मुख्यमंत्र्यांनी भेट देण्याची प्रथा, परंपरा आणि संस्कृती आहे याची जाणीव आहे. परंतु यावेळी नाईलाज झाला, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी लेखक, प्रकाशकांचा अमळनेर साहित्य संमेलन आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.