नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!’ अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ त्यांनी रोवली असे सांगत रंजले गांजलेल्यासाठी काम करण्याची सर्वांचीच जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
श्रीमंत जगद्गुरू श्री.संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठान, पुणे आयोजित वारकरी भक्तांचा भव्य मेळावा व सत्कार तसेच ‘अभंग पंचविशी’ प्रकाशन व ग्रंथदान सोहळा श्रद्धा लॉन्स नाशिक येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार माणिकराव कोकाटे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, ह.भ.प. रामकृष्ण महाराज लहवितकर, ह.भ.प.डॉ.रामकृष्ण दास महाराज, ह.भ.प. त्र्यंबकदादा गायकवाड, वक्ते शेख सुभान आली, अविनाश काकडे, नानासाहेब महाले, विष्णूपंत म्हैसधूने, निवृत्ती अरिंगळे, दत्तूपंत डुकरे, प्रेरणा बलकवडे, निलेश गाढवे, भारत घोटेकर, ह.भ.प अशोक काळे,डॉ.गुणवंत डफरे, कृष्णा काळे, मनोहर कोरडे, सुनील आहिरे यांच्यासह पदाधिकारी व वारकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच’ एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या नावातच “राम” आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युगप्रर्वतक महापुरुषाने तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती. यामुळे तुकाराम महाराजांना “जगदगुरू” असे संबोधले जाते असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. भागवत धर्माचा कळस होण्याचे महानभाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत. ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केलेला असल्याचे त्यांनी सांगितले. संत तुकारामांनी वाईट प्रथेवर आणि अंधश्रद्धेवर टीका करताना काही हाताचे राखिले नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म मानला. भेदाभेदभ्रम अमंगळ हे ठासून सांगितले. संतांनी समाजाच्या दुःखाला आणि वेदनेला आपल्या साहित्यातून आणि कार्यातून वाचा फोडली. जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे अभंग आजही आपणाला दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देतात असे त्यांनी सांगितले.