सातपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डोक्यावर तुळशीवृंदावन, माऊलीचा गजर, विणेकरी-टाळकरींचा अखंड नाद अशा उत्साहपुर्ण वातावरणात रविवारी विविध शहरातून निघालेल्या दिंड्या सातपूरला दाखल झाल्या आहे. वारकऱ्यांच्या अखंड नामस्मरणामुळे सातपूरनगरी भक्तिमय वातावरणात दुमदुमली आहे. विविध सामाजिक राजकीय संस्थासह घरोघरी दिंड्यांचे स्वागत करण्यात येत आहे.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सव (पौष वारी) मंगळवारी (दि.६) साजरा होत आहे. त्याअनुषंगाने एक दोन दिवस अगोदरच राम कृष्ण हरी…जय हरी विठ्ठल… असा गजर करत वारकऱ्यांच्या दिंड्या सातपूरनगरीत दाखल झाल्या आहे. आलेल्या वारकऱ्यांचे सातपूर विभागातील अनेक राजकीय, सामाजिक संस्थाकडून स्वागत होत आहे.
महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीने प्रत्येक दिंडीचे स्वागत करण्यात येत आहे. माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या हस्ते प्रत्येक दिंडीस संत निवृत्तीनाथ महाराज यांची प्रतिमा तसेच शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यासाठी पपया नर्सरी येथे मनोरमा उभारण्यात आला असून महाराष्ट्र वारकरी महामंडळ शहराध्यक्ष ह.भ.प.धनंजय महाराज रहाणे, जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. श्रावण महाराज अहिरे, जिल्हा सचिव ह.भ.प. लहू महाराज अहिरे, सिन्नर तालुका अध्यक्ष ह.भ.प. अरुण महाराज दराडे,जिल्हा कार्याध्यक्ष ह.भ.प. दत्तात्रय महाराज डुकरे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज आहेर,ह.भ.प. सुभाष महाराज बछाव, ह.भ.प. भास्कर महाराज बंदावणे आदी परिश्रम घेत आहे.
दरम्यान, सातपूरला अनेक रहिवाशी भागात दिंड्या मुक्कामी आहे. घरोघरी दिंड्यांचे स्वागत होत असून सकाळी त्र्यंबकेश्वर कडे प्रस्थान करणार आहे.