इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सरकार तुमचं आहे असं म्हणताय, मग तुमच्या आमदाराला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करण्याची गरज का पडली? असा सवाल करत शिवसेनेचे पक्षपमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. कोकण दौ-यावर झालेल्या सभेत त्यांनी अनेक मुद्दांना हात घालत केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा हा दौरा सध्या चर्चेत असून त्यांनी या दौ-यात विविध ठिकाणी सभा घेतल्या.
यावेळी ते म्हणाले की, सत्तेच्या हव्यासापायी तुम्ही बाजारबुणगे तुमच्या पक्षात घेतलात, हेच तुमचं हिंदुत्व का? असा प्रश्नही केला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधीत करतांना सांगितले की, तुमचं प्रेम हिच माझी ताकद, हिच माझी शक्ती! माझ्याकडे भाडोत्री माणसं नाहीत, निष्ठावंतांची फौज आहे. जे आपल्या अंगावर चालून आलेयत, त्यांचं नाव पुढची पिढी राजकारणातून विसरून गेली पाहिजे.
यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, आमची बात ‘मन की बात नाही’, ‘दिल की बात‘. मनामध्ये काळंबेरं असू शकतं पण हृदयामध्ये नाही. घोषणांचा पाऊस असेल आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असेल तर दुष्काळात तेरावा महिना असलेलं हे मोदी सरकार आपल्याला नको. ‘भारत सरकार’ ऐवजी ‘मोदी सरकार’ का? तुम्ही देशाचं नाव ‘भारत’ बदलून ‘मोदी’ ठेवलंय का?
प्रधानमंत्री निसर्ग, तौक्ते चक्रीवादळात आले नाही, महाराष्ट्राला संकटात पैसा दिला नाही. पण महाराष्ट्र संकटात ताकदीने उभा राहतो आणि देशालाही उभा करतो. मोदीजी आम्ही तुमचे शत्रू कधीच नव्हतो, नेहमी सोबतच होतो. तुम्ही आम्हाला दूर केलात. मोदीजी तुमच्या पिलावळीने जर देशाचे काम केलं असतं तर पक्ष फोडाफोडीची वेळ तुमच्यावर आली नसती. भगव्या झेंड्यात छेद करण्याचं काम मोदीजी तुमच्या लोकांनी केलंय.