अमळनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी सात आठ वर्षांनी होणाऱ्या साहित्य संमेलनात एआय कट्टा (कृत्रिम बुद्धिमत्ता) असेल. त्यात रोबोटिक कवी, कवयित्री सहभागी होतील. भविष्यात सकस साहित्य उत्पन्न करू शकलो तर तंत्रज्ञान उपोयोगी ठरेल. ज्यामुळे सामान्यांचे हित होत असेल त्यास साहित्य मानावे, असा सूर ‘वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्य’ या परिसंवाद उमटला. या परिसंवादाचे आयोजन कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात करण्यात आले होते. परिसंवादाच्या अध्यक्षपदी मिलिंद मराठे हे होते.
दीपक शिकापूर म्हणाले की, आयुष्यात ऐटीत जगाचे असेल तर आयटी वापरावे. इंटरनेट तंत्रज्ञानात रिचला अनन्यसाधारण महत्व आहे. यातून इतिहास व भूगोल जमा झाला आहे. लवकरच आभासी साहित्य संमेलन होईल असा आशावाद व्यक्त केला. मेटाव्हर्स हे एक प्रभावी तंत्रज्ञान आहे. लॉकडाऊन काळात हे तंत्रज्ञान लोकप्रिय झाले. आगामी सात आठ वर्षांनी होणाऱ्या साहित्य संमेलनात एआय कट्टा असेल. त्यात रोबोटिक कवी, कवियत्री सहभागी होतील असा आशावाद मांडला. कृत्रिम बुद्धीमत्तेची साकारात्मक व नाकारात्मक पैलू असल्याचे स्पष्ट केले. तंत्रज्ञानाला शत्रू मानू नका त्यास स्नेही मानावे असे मत मांडले.
नम्रता फलके म्हणाले की, भारत स्वातंत्र झाला. यानंतर भारतात तंत्रज्ञान हळू हळू येत गेले. याचे चित्रण ग्रामीण कादंबरीत आले. ललित साहित्यात जयंत नारळीकर यांनी यंत्रमानव व मानव यांच्या भावविश्वाचे चित्रण केले आहे. आज पुस्तक चार फॉरमॅटमध्ये येते. जसे हार्ड, सॉफ्ट, ऑडिओ, व्हिज्वल आहे. अरुण काळे यांचा मागून आलेले लोक हा काव्य संग्रह, राहुल बनसोडे यांनी भावनिक गुंतागुंत उलगडली आहे. पटेली यांनी ऑनलाईन जाहिरातीच्या माध्यमातून १ हजार पुस्तकांची विक्री केली. डिजिटल मीडिया हे आता मेन स्ट्रीम झाला असल्याची भावना व्यक्त केली.
मिलिंद कीर्ती म्हणाले भारताचा ५ डिजिटल महासत्ता म्हणून उदय होत आहे. मोबाईलचा वापर करणारे लोक हे लेखक बनले आहे. कोणीही लिहू शकतो, प्रसिद्ध करु शकतो. एआयमुळे यंत्रे बोलू व चालू लागली आहेत. ही यंत्रे तुमच्यावर पाळत ठेवून आहेत. ऑनलाईन खरेदीत डिस्काउंटच्या माध्यमातून वस्तुंच्या किमती कमी होत आहेत. मानवाची सृजनशीलता कमी होत आहे. तंत्रज्ञान मोफत मिळत असल्याने त्याची भुरळ पडली आहे. मात्र, एआय अणू बॉम्ब पेक्षा अधिक विध्वंसक होत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
सागर जावडेकर म्हणाले की, भाषा हा एकमेकांना जोडणारा पूल आहे. अनेक क्षेत्रात वेबसाईट निर्माण होत आहे.आयटी क्षेत्र वरदान ठरत असताना त्याचा दुरुपयोग केला जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्ता ही वरदान नसून तिचा कमीत कमी वापर करण्यात यावा. तंत्रज्ञाचा वापर करा बुद्धिमत्ता गहाण टाकू नका. आयटीमुळे शत्रू मित्र बनत आहे. बुद्धिमत्तेची कस लावायला विसरू नका असा सल्ला त्यांनी दिला.
संदीप माळी म्हणाले तंत्रज्ञामुळे साहित्यात बदल होत आहे. वाचक, लेखक यांची संख्या वाढत आहे. वर्तमानपत्रात आपले साहित्य छापून आणण्याचा विचार मागे पडत आहे. इंटरनेटवर प्रसिद्ध होणारे साहित्याचा दर्जा त्याला मिळणाऱ्या कमेंट, लाईक, व्ह्यूव वरून ठरविले जात आहे. इ बुक, ऑडिओ बुकद्वारा प्रकाशकांची मक्तेदारी मोडीत काढली आहे. नवं लेखकांना नव नवीन टेम्पलेट उपलब्ध आहेत. दुर्मिळ पुस्तक डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाली आहेत. पुस्तक प्रकाशनाचा खर्च नगण्य झाला असल्याचे मत मांडले.
अध्यक्ष मिलिंद मराठे म्हणाले की, तंत्रज्ञामुळे रोजगार निर्मिती होत आहे. जगाच्या सुरुवातीपासून नवं तंत्रज्ञानाला विरोध करण्यात येतो. हा लढा सतत चालणारा आहे. तंत्रज्ञाचा वेग वाढला आहे. तंत्रज्ञान सर्वांकुंश झाले आहे. ऑडिओ बुक ऐकतांना केवळ सुरातील चढ उताराकडे लक्ष दिले जाते. त्याच्या आशयाकडे नाही असे स्पष्ट केले. माणसाचे मौलिक चिंतन जगातील कोणतेही डिव्हाईस करू शकत नाही. तंत्रज्ञाचा वापर हितासाठी करण्यासाठी संस्काराशिवाय दुसरा मार्ग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सकस साहित्य उत्पन्न करू शकलो तर तंत्रज्ञान उपयोगी ठरते. ज्याच्यामुळे सामन्यांचे हित होत असते त्यास साहित्य म्हणावे असे मत मांडले.