नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, ओदिशात संबलपूर इथे, ६८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्यांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये, नैसर्गिक वायू, कोळसा आणि ऊर्जा निर्मितीशी संबंधित, ऊर्जा क्षेत्राला अधिक चालना देणाऱ्या प्रकल्पांचा समावेश आहे. त्याशिवाय, रस्ते, रेल्वे आणि उच्चशिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्वाचे प्रकल्पही आहेत. यावेळी, पंतप्रधानांनी, आयआयएम संबलपूर परिसराची पाहणी केली आणि तिथे आयोजित केलेल्या प्रदर्शनालाही भेट दिली.
यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले, “आज इथे, शिक्षण, रेल्वे, रस्ते, वीज आणि पेट्रोलियम या क्षेत्रांमध्ये आज सुमारे 70,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ झाला आहे, त्यामुळे ओदिशाच्या विकासाच्या प्रवासासाठी आज एक महत्त्वपूर्ण प्रसंग आहे.” ओदिशातील गरीब वर्गातील लोक, मजूर, कामगार वर्ग, व्यापारी आणि शेतकरी यांच्यासह समाजातील इतर सर्व घटकांना आजच्या विकास प्रकल्पांचा लाभ मिळेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यामुळे ओदिशातील तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो नवीन संधी निर्माण होतील, असेही ते पुढे म्हणाले.
देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी यंना भारत रत्न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. माजी उपपंतप्रधान अडवाणी यांनी, गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री, तसेच दीर्घकाळ खासदार म्हणूनही देशासाठी अद्वितीय योगदान दिले आहे, असे मोदी म्हणाले. “अडवाणीजी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करणे हे ज्यांनी आपल्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित केले त्यांना देश कधीही विसरत नाही, या भावनेचे प्रतीक आहे.” लालकृष्ण अडवाणी यांनी दाखवलेले प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शनासाठी पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आणि सर्व देशवासियांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले.
ओदिशाला शिक्षण आणि कौशल्य विकासाचे केंद्र बनवण्यासाठी, सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आता ओदिशात आयआयएसईआर बेहरामपूर आणि भुवनेश्वर इथले इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी अशा संस्थांची स्थापना गेल्या एका दशकात करण्यात आली. या अत्याधुनिक शिक्षण संस्थामुळे इथल्या युवकांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन येईल, असेही ते पुढे म्हणाले..
आता, आय. आय. एम. संबलपूर ही आधुनिक व्यवस्थापन संस्था स्थापन झाल्यामुळे शिक्षणक्षेत्रात राज्याची भूमिका आणखी मजबूत होत आहे. महामारीच्या काळात आय. आय. एम. (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) ची पायाभरणी केल्याचे त्यांनी स्मरण केले आणि सर्व अडथळ्यांदरम्यान ते पूर्ण करण्याशी संबंधित असलेल्या सर्वाची प्रशंसा केली. “सर्व राज्यांचा विकास झाला तरच विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य होईल”, पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आणि त्यांनी ओदिशा राज्याला प्रत्येक क्षेत्रात जास्तीत जास्त सहाय्य केले जाईल, असे आश्वासन दिले. केंद्र सरकारची गेल्या दहा वर्षांमधील कामगिरी अधोरेखित करत, ते म्हणाले की, ओदिशाच्या पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, राज्याच्या रेल्वे अर्थसंकल्पाला १२ पटींहून अधिक चालना मिळाली आहे. ओदिशाच्या ग्रामीण भागात पीएम ग्राम सडक योजनेअंतर्गत ५० हजार किलोमीटर रस्त्यांचे बांधकाम आणि ४ हजार किमी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचा त्यांनी उल्लेख केला. तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या आजच्या उद्घाटनाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी सांगितले की ओदिशा आणि झारखंडमधील आंतरराज्यीय संपर्कामुळे प्रवासाचे अंतर कमी होईल. हा प्रदेश खाणकाम, ऊर्जा आणि पोलाद उद्योगांच्या क्षमतेसाठी ओळखला जातो, असे नमूद करून पंतप्रधान मोदी म्हणाले की नवीन दळणवळण सुविधा संपूर्ण प्रदेशात नवीन उद्योगांच्या शक्यता निर्माण करेल, ज्यामुळे हजारो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. संबलपूर-तालचेर रेल्वे विभागाचे दुहेरीकरण आणि झार-तर्भा ते सोनपूर या नवीन रेल्वे मार्गाच्या पायाभरणीचाही त्यांनी उल्लेख केला. “सुवर्णपूर जिल्हा पुरी-सोनपूर एक्स्प्रेसने देखील जोडला जाईल, ज्यामुळे भाविकांना भगवान जगन्नाथाचे दर्शन घेणे सोपे होईल”, ते म्हणाले. आज उद्घाटन करण्यात आलेली सुपरक्रिटिकल आणि अल्ट्रा-सुपरक्रिटिकल औष्णिक ऊर्जा केंद्रे ओदिशातील प्रत्येक कुटुंबासाठी पुरेशी आणि परवडणारी वीज सुनिश्चित करतील, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
“गेल्या 10 वर्षांत केंद्र सरकारने केलेल्या धोरणांचा ओदिशाला खूप लाभ मिळाला आहे”, पंतप्रधान म्हणाले. खनिकर्म धोरणातील बदलानंतर ओदिशाचे उत्पन्न 10 पट वाढल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्वीच्या धोरणात ज्या ठिकाणी खाणकाम होते, त्या प्रदेशांना आणि राज्यांना खनिज उत्पादनाचे फायदे मिळत नव्हते, हे नमूद करून, खाणकामातून मिळालेल्या उत्पन्नातून त्याच क्षेत्राच्या विकासासाठी गुंतवणुकीची हमी देणाऱ्या जिल्हा मिनरल फाऊंडेशनच्या स्थापनेद्वारे या समस्येचे निराकरण करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. “ओदिशाला आतापर्यंत 25,000 कोटींहून अधिक निधी प्राप्त झाला आहे आणि तो ज्या भागात खाणकाम होत आहे त्या भागातील लोकांच्या कल्याणासाठी वापरला जात आहे.” आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी ओदिशाच्या जनतेला आश्वासन दिले की केंद्र सरकार अशाच समर्पित भावनेने राज्याच्या विकासासाठी काम करत राहील.
ओदिशाचे राज्यपाल रघुबर दास, ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.