मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरे, महामार्ग त्याचप्रमाणे दुर्गम भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्र सरकार विविध पर्यायांचा शोध घेत आहे. वाहतूक कमी करण्यात रोपवे महत्त्वाची भूमिका बजावतील असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी म्हणाले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या प्रसंगी आज मुंबई येथे ते बोलत होते. या समारंभाला महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण आणि वरील विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान इंडियन अकॅडमी ऑफ हायवे इंजिनियर्स (रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय) आणि महाराष्ट्र शासनाचा नगर विकास विभाग यांनी महाराष्ट्रातील सहा शहरांमध्ये (मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजी नगर, आणि नाशिक) वाहतूक सिम्युलेशन मॉडेल विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला. याशिवाय नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड ( NHLML) आणि महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यात रोपवे विकासासाठी सामंजस्य करार केला.
याप्रसंगी या विषयावर सविस्तर विवेचन करताना गडकरी म्हणाले की, राज्यातील विविध भागांत रोपवे विकसित केले जातील. सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे त्यासाठी ४० प्रस्ताव आले आहेत. काम जलदगतीने करण्यासाठी संबंधित विभागाने डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) सादर करावा. रोपवे बांधताना त्या भागातील पर्यटकांसाठी पार्किंग सुविधा, निवास आणि भोजनव्यवस्था विकसित करावी जेणेकरून पर्यटकांची संख्या वाढेल. रोपवे व्यवस्था परवडणारी असल्याने वाहतूक समस्या कमी करण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
गडकरी पुढे म्हणाले की रोपवे बांधताना त्या भागात उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठ विकसित करावी. तसेच वाहनांच्या चार्जिंगसाठी सुविधा देऊन सौरऊर्जेच्या वापराला प्राधान्य द्यावे. देशात सर्वत्र नागरीकरण वाढत आहे. अशा स्थितीत वाहतूक नियोजनाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक आहे. अभियंता अकादमीच्या माध्यमातून अभ्यास केल्यावर वाहतूक सुरळीत होऊन अपघात कमी होतील. असे प्रतिपादन मंत्रीमहोदयांनी केले. वाहतूक समस्या कमी करण्यासाठी केंद्र सरकार विविध पर्यायांचा शोध घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले. आम्ही बेंगळुरू, चेन्नई, नागपूर आणि पुणे यासारख्या शहरांमध्ये द्विस्तरीय उड्डाण पूल बांधले आहेत. या प्रणालीचे चांगले परिणाम मिळत आहेत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर खूप उपयुक्त आहे असे ते म्हणाले.