नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक आणि नगर उपकेंद्राला अनेक वर्षांनंतर अखेर पहिला वर्ग १चा प्रशासकीय अधिकारी मिळाला आहे. श्री. श्रीपाद यशवंत बुरकुले यांची विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या तर शिवप्रसाद घालमे यांची नगर उपकेंद्राच्या सहायक कुलसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य तथा उपकेंद्र विकास समिती अध्यक्ष श्री.सागर वैद्य यांच्या प्रयत्नांमुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे.
२६ ऑगस्ट रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषद बैठकीत विद्यापीठाच्या नाशिक आणि नगर उपकेंद्र अधिक सक्षम, विद्यार्थी उपयोगी व्हावे यासाठी दोनही उपकेंद्रांना सहायक कुलसचिव दर्जाचा वर्ग १चा अधिकारी देण्यात यावा अशी मागणी सागर वैद्य यांनी केली होती. ती मान्य करण्यात आली. मागील ५ महिने ही निवड प्रक्रिया सुरू होती. या दोनही पदाची जाहिरात, अर्ज छाननी, मुलाखत आदी प्रक्रिया पार पाडण्यात आली. २५ जानेवारीला कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि सागर वैद्य यांच्या निवड समितीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
नगर उपकेंद्रासाठी श्री. शिवप्रसाद घालमे यांची तर नाशिक उपकेंद्रासाठी श्री.श्रीपाद बुरकुले यांची निवड करण्यात आली. श्रीपाद बुरकुले हे पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभाग, पीएच.डी. विभाग, सेट विभागात सहायक कुलसचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यासारखा अनुभवी अधिकारी लाभल्याने नाशिक उपकेंद्र अधिक विद्यार्थीभिमुख, सक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..
उपकेंद्र कॅम्पस म्हणून नावारूपाला आणू
नव्या वर्षात नाशिक उपकेंद्रासाठी ही गुड न्युज आहे. अमृत महोत्सवी वर्षात का होईना उपकेंद्राला पहिला वर्ग १चा प्रशासकीय अधिकारी मिळाला. नाशिक उपकेंद्राच्या शिवनाई शिवारातील बांधकामही वेगाने सुरू आहे. लवकरच नगर आणि नाशिक उपकेंद्राच्या कॅम्पसचे उदघाटन करण्याचा प्रयत्न आहे. लवकरच उपकेंद्र कॅम्पस म्हणून नावारूपाला आणू.
सागर वैद्य, व्यवस्थापन परिषद सदस्य