इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न घोषित झाल्यानंतर सर्वच पक्षातील नेते त्यांचे अभिनंदन करत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुध्दा त्यांचे अभिनंदन केले असून त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावरही शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाच्या प्रमुख संस्थापकांपैकी एक लालकृष्ण अडवाणीजी ह्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित झाला ह्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन.
केंद्र सरकारचं देखील अभिनंदन, अर्थात गेली १० वर्ष केंद्रातील निर्विवाद सत्ता हाती असताना, ज्यांच्यामुळे भाजप आज ज्या स्थानावर आहे त्या व्यक्तीला हा सर्वोच्च सन्मान ह्या आधीच मिळायला हवा होता. अर्थात हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. असो.
करोडो भारतीयांचं आणि अनेक पिढ्यांचं, राममंदिराचं स्वप्न पूर्ण झालं, त्यात मोलाचा वाटा हा अडवाणीजींचाच, आणि हे करताना त्यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावली, राजकीय अस्पृश्यता आणि उपेक्षा सहन केली. रथयात्रेतून अडवाणीजींनी देशातील हिंदूंची अस्मिता जागृत केली आणि भारतीय जनता पक्षाचा उदय झाला, पण हे करताना ‘अब की बारी अटलबिहारी’ म्हणण्याइतका मनाचा मोठेपणा हा अडवाणीजींकडे होता.
देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आजपर्यंतच राजकारण पाहिलेले आणि देशातील राजकारणाला वळण देणाऱ्या ह्या ज्येष्ठ नेत्याचं ह्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन !