नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शिकलकर वस्ती भागात पूर्ववैमनस्यातून काका पुतण्यावर टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत लोखंडी रॉड व कोयत्याचा वापर करण्यात आल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांपैकी दोघांना गुडाविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हुसेन शेख, सकलेन शेख, रजिक बाकसी, सोहेल शेख, अमन शेख, इमरान शेख, निरंक नरोटे, एजाज रफिक मनियार उर्फ फज्जा, साधिक सलीम शेख, फरदीन, अक्षय घोडेराव उर्फ निखील राजेंद्र घोडेराव, चैतन्य बोंदरे व अन्य पाच सहा जण अशी दोघांवर हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत पुजा पवन वैष्णव (रा.पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. वैष्णव यांचे वडिल प्रकाश संपत कांबळे व चुलत भाऊ अतिश अशोक कांबळे हे दोघे गुरूवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास शिकलकर वस्तीतील शिवमंदिराजवळून जात असतांना संशयितांनी जुने भांडणाच्या कारणातून वाद घालत दोघांवर हल्ला केला.
या घटनेत लोखंडी रॉड व कोयत्याचा वापर करण्यात आल्याने दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके करीत आहेत. दरम्यान संशयितांपैकी सादिक सलिम शेख (१९) व सकलेन फिरोज शेख (१८ रा.दोघे सिन्नरफाटा) यांना गुंडाविरोधी पथकाने ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात बेड्या ठोकल्या असून ते शुक्रवारी (दि.२) रात्री पसार होण्याच्या प्रयत्नात होते.