नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जयभवानी रोड वरील फर्नाडिसवाडी भागात पूर्ववैमनस्यातून इमारतीवर काचेच्या बाटल्या फेकून टोळक्याने महिलेच्या दिशेने पिस्तूलातून गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत महिला बालंबाल बचावली असून पोलीसांनी एका संशयितास बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय चमन बेद (३७ रा.फर्नाडीसवाडी जयभवानीरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, मयुर बेद, संजय बेद, टक्कू उर्फ सनी पगारे, बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे, ईर्शाद चौधरी,दिपक चाट्या व गौरव गांडले आदी त्याचे साथीदार अद्याप फरार आहेत. याबाबत बरखा अजय उज्जैनवाल (रा.साईश्रध्दा अपा. फर्नांडीसवाडी जयभवानीरोड) यांनी फिर्याद दिली आहे. उज्जैनवाल दांम्पत्य गुरुवारी (दि.१) मध्यरात्री झोपी गेले असता अचानक त्यांच्या इमारतीच्या खाली काचेच्या बाटल्या फोडण्याचा आवाज व शिवीगाळ ऐकू आली. त्यामुळे दोघे पती पत्नी काय झाले बघण्यासाठी इमारतीखाली आले असता ही घटना घडली. हातात कोयते घेवून आलेल्या संशयित टोळक्याने रिकाम्या बाटल्या फोडून मुलगा राहुल उज्जैनवाल याच्या नावाने शिवीगाळ करत असल्याचे त्यांना दिसले.
बरखा उज्जैनवाला यांनी राहुल घरी नसल्याचे त्यांना सांगितले. मात्र संशयितांनी राहुलला समोर आणा, त्याचा मुडदा पाडतो, अशी धमकी देत संशयित हशाद चौधरीने बरखा उज्जैनवाल यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. मात्र सुदैवाने त्या गोळ्या बाजूने गेल्याने बरखा उज्जैनवाल बालंबाल बचावल्या. आरडाओरड व गोळीबाराच्या आवाजाने रहिवासी जागे होताच संशयित दोन दुचाकींवर पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत दोन रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या असून संजय बेद या संशयितास अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुयोग वायकर करीत आहेत.