अमळनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : मरीआई, नंदी बैल व पारधी समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यास समाजानेही साथ देणे गरजचे आहे. आधुनिकतेची कास धरत चंद्रावर जात असताना भटक्या विमुक्त समाजालाही समजून घेत त्यांच्या प्रगतीसाठी काम करणारे साहित्य आणि युवक तयार होणे ही काळाची गरज असल्याचे मत पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठाच्या पहिल्या सत्रात रवींद्र गोळे (मुंबई), सारंग दर्शने( मुंबई) यांनी त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश काटे यांनी केले.
ते म्हणाले की, सी.एम. केतकर, माजगावकर, शरद कुलकर्णी अशा आमच्यात साहित्य परिषदेत मार्क्सवादावर खडाजंगी चर्चा होत असे. त्यावर माणूस या साप्ताहिकात लेखन करत असे. मात्र माजगावकरांनी नुसते असे लेखन करण्यापेक्षा कृती करून लेखन करण्याचा सल्ला दिला आणि तो तंतोतंत अंमलात आणला. त्यासाठी मी काही दिवस खेडेगावात राहण्यास गेलो. रेल्वेने जाण्यासाठी स्टेशनवर आलो असता तेथे खुप मोठी गर्दी दिसली. ३० ते ४० जण परिवारासह तेथे आले होते. त्यावेळी कोणताही कार्यक्रम, राजकीय सभा नसताना एवढी गर्दी पाहून उत्सुकता वाढली. त्यामुळे त्यांच्याशी बोलणे केले. त्यानुसार त्यांच्या गावात पाण्याची टंचाई असल्याने शेती पिकली नाही. पिण्यास पाणी नाही म्हणून गाव सोडून जात असल्याचे त्यांनी सांगितले. आणि मनात धस्स झाले.
निमगाव म्हाळगी येथे राहत असताना गावात नंदी बैलवाला, मरीआई वाले, पारधी भिक्षा मागण्यास येत. शिक्षण, संस्कार या सारख्या विविध बाबींचा गंधही नसलेल्या या समाजाबद्दल जवळून माहिती घेतली आणि ठरवले की या समाजाच्या प्रगतीसाठी आपण काम करायला हवे. ही स्थिती तेव्हाची असली तरी आजही ग्रामिण भागातील स्थिती फारशी वेगळी नाही. ग्रामीण भागात आजही पाण्याची स्थिती गंभीर आहे. तेव्हा हा समाज गावाच्या प्रमुखाची कामे विनामोबदला करत त्या बदल्यात प्रमुख त्यांना धान्य देत असे. काळ बदलला. प्रमुखाकडून मोफत धान्य देणे बंद झाले आणि बारा बलुतेदार त्यांच्या कामासाठी व मोबदल्यासाठी वणवण फिरू लागले. कामधंदा नसल्याने चोऱ्या करू लागले. पोलीस त्यांना पकडू लागले. कोठे काही झाले की पहिला संशय यांच्यावरच. पोलीस येत पुरूषांना पकडून घेवून जात. त्यांच्या महिला मग कोर्टकचेऱ्यातच आयुष्य घालवत. त्यातुन तो सुटला तर दुसरे पोलीस हजर. अशा रितीने या समाजांचे जीवन हालाखीचे झाले आहे. ही सामाजिक असंतोषाची नांदी असल्याचे त्यांनी सांगितले.









