इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नांदेडः समाजात होत असलेल्या बदनामी लाकंटाळून आई-वडिलांनीच पोटच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्हयातील हिमायतनगर शहरातील नेहरूनगर भागात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी दोघा मातापित्यांना अटक केली असून त्यांनी खून केल्याची कबुली दिली.
अंकिता रामराव पवार (वय १७) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. तिचे परिसरातील एका युवकावर प्रेम होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीला समजावून सांगूनही ती महिनाभरापूर्वी मुलासोबत पळून गेली. पळून नेणाऱ्याविरोधात पोलिसांनी ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुलीची समजूत काढून तिला घरी आणल्यानंतरही तिच्या वागण्यात बदल झाला नाही. त्याच मुलासोबत लग्नाचा तिचा अट्टहास सुरू होता. त्यामुळे संतापलेल्या आई वडिलांनी मुलीचा खून केला.
असा उघड झाला खूनाचा उलगडा
अगोदर आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. पण, शवविच्छेदनात मुलीच्या डोक्याला तसेच अन्य ठिकाणी गंभीर जखमा असल्याचे स्पष्ट झाल्याने या मुलीचा खून झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर हा खूनाचा उलगडा झाला.
डोक्यवार विळ्याने वार
शुक्रवारी मध्यरात्री गाढ झोपेत असताना आईवडीलांनी अंकिताच्या कपाळावर, डोक्याच्या पाठीमागे विळ्याने वार केले. त्यात तिचा मृत्यू झाला. खून लपविण्यासाठी तिने आत्महत्या केल्याचे भासवण्यात आले. मुलीची आई पंचफुलाबाई आणि वडील रामराव पवार या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.









