इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कल्याणः कल्याण पूर्व मतदारसंघातील भाजप आमदाराने पोलिसांसमोर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या गोळीबारप्रकरणी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या आमदाराला अटक करण्यात आली आहे. पालघरमध्ये काल अजित पवार गटाचा माजी सरपंच आणि भाजप नेत्यात भर ग्रामसभेत हाणामारी झाल्याच्या घटनेनंतर ही गोळीबाराची घटना समोर आली आहे. सत्ताधारी पक्षातच आपआपसात हे भांडण होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
आ. गायकवाड आणि महेश गायकवाड हे दोघेही जमिनीचा वाद मिटवण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. ते पोलिस अधिकाऱ्याशी चर्चा करत असतानाच वाद होऊन आ. गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्याने शिंदे गटाचा पदाधिकारी असलेल्या महेश गायकवाड यांच्यावर चार तर त्यांच्या मित्रावर दोन गोळ्या झाडल्या. जखमी झालेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गायकवाड हे कल्याण पूर्व मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. दोनदा ते अपक्ष म्हणून निवडणून आले आणि तिसऱ्यांदा ते भाजपचे आमदार झाले. महेश गायकवाड हे कल्याण (पूर्व) येथील शिवसेनेचे नगरसेवक आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत.
या गोळीबारात जखमी झालेले शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. आमदाराने गायकवाड तसेच राहुल पाटील यांच्यावर झाडलेल्या सहा गोळ्या काढण्यात डॉक्टर यशस्वी झाले आहेत.
हा आहे वाद
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गायकवाडांमध्ये अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागेवरून वाद होता. हा वाद सोडवण्यासाठी उल्हासनगरच्या पाच हिललाईन पोलिस ठाण्यात दोघांना बोलवण्यात आले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये चर्चा सुरू असताना दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या एका साथीदाराने आपल्याकडील बंदूक काढून अंदाधुंद गोळीबार केला.