इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मस्जिद समितीने ज्ञानवापीच्या व्यास तळघरातील पूजेच्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती; परंतु न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. व्यास तळघरात पूजा सुरू राहणार असून या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा तारखेला होणार आहे. तोपर्यंत पूजेवर बंदी नाही.
भारतीय पुरातत्व खात्याच्या अहवालावर वाराणसी जिल्हा न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्याच वेळी, उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला जागा संरक्षित करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर कोणतेही नुकसान किंवा बांधकाम होऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांची रिसीव्हर नियुक्ती असताना विरोध का केला नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली. मस्जिद समितीला आपल्या अपीलमध्ये सुधारणा करून जिल्हा न्यायाधीशांच्या १७ जानेवारीच्या आदेशाला आव्हान देण्यास सांगण्यात आले आहे. १७ जानेवारीच्या आदेशानुसार, जिल्हाधिकाऱ्यांना व्यास तहखानाचे रिसीव्हर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. याशिवाय, न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत.
याआधी न्यायालयाने उत्तर प्रदेशच्या महाधिवक्त्यांना सद्यस्थिती स्पष्ट करण्यास सांगितले आहे. महाधिवक्ता म्हणाले, की तळघरात पूजा सुरू झाली आहे. तळघरातही मोठ्या संख्येने लोक येत आहेत. न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारकडून तेथे केलेल्या व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती मागवली आहे. १७ जानेवारीच्या आदेशाला आव्हान का दिले नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी मस्जिद समितीच्या वकिलांना विचारले, की,तुम्ही जिल्हाधिकारी रिसीव्हर म्हणून नियुक्त करण्याच्या १७ जानेवारीच्या आदेशाला आव्हान दिले नाही. ३१ जानेवारीच्या आदेशाविरोधात थेट याचिका दाखल करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत तुमच्या अर्जाची मेंटेनेबिलिटी काय आहे ते सांगा. उत्तर प्रदेश सरकारने माहिती दिल्यानंतर, हिंदू पक्षाने मशीद समितीच्या याचिकेवर आक्षेप व्यक्त केला आणि याचिका फेटाळण्याचे आवाहन केले. वाराणसी कोर्टाच्या निर्णयानंतर ज्ञानवापी कॅम्पसमधील व्यासजींच्या तळघरात प्रार्थना सुरू झाल्या. ३१ वर्षांनंतर पूजा सुरू झाली आहे. या प्रकरणी ज्ञानवापी मशीद समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयातूनही समितीला दिलासा मिळाला नाही.
आज ज्ञानवापी मशिदीचा परिसर पूर्णपणे भरून गेला. यानंतर नमाजासाठी कोणालाही आत प्रवेश देण्यात आला नाही. पोलिसांनी लोकांना इतर मशिदीत नमाज अदा करण्याचे आवाहन केले आहे.