नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात सध्या सुरू असलेले राजकारण भाजपला भविष्यात परवडणार नाही, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही आलेले नाही. उद्या सत्ता गेली तर काय होईल याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करायला पाहिजे, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर निशाना साधला. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींचा दाखला दिला. इंदिरा गांधी यांनी केलं असे म्हणतात मग त्यांनी केलं तर तुम्ही का करतात असा सवालही त्यांनी केला.
नाशिक दौ-यावर असलेल्या राज ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ईडी कडून होत असलेल्या चौकशीवरून भाजपवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, २०१४ मध्ये मी पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा दिला नव्हता तर त्यांच्यासारखी व्यक्ती पंतप्रधानपदावर असावी, अशी फक्त इच्छा व्यक्त केली होती. या वेळी अजून तसा काही विचार केलेला नाही. पंतप्रधानपदी कोण असावा, याची चाचपणी सुरू असून तशी चाचपणी झाली की सांगेन.
यावेळी लोकसभेच्या निवडणुकीबाबत बोलतांना ते म्हणाले की, लोकसभा सर्व जागा लढवाव्यात, अशी मागणी पक्षातून झाली आहे. नगर, शिर्डीचे पदाधिकारी येऊन गेले. कुठे आणि का निवडणूक लढवावी याबाबत चाचपणी करत असल्याचे सांगून राज ठाकरे यांनी स्वबळावर सर्व जागा लढवण्याचे संकेत दिले. नाशिककरांनी मतदान केले म्हणून नाही, म्हणून मी नाशिकला येत नाही, तर कार्यकर्त्यांमधील गटबाजीचा वीट आल्याने मी येत नाही, अशी कानउघाडणी करून, एकमेकांचे पाय ओढणे बंद केले नाही, तर मला नाशिक ऑप्शनला टाकावे लागेल असा त्यांनी दिला.
या पत्रकार परिषदेत त्यांनी अयोध्येला, टोल, महाविकास आघाडी याबरोबरच इतर प्रश्नांनाही उत्तर दिले.