नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – म्हसरूळ परिसरात बुधवारी (दि.३१) वेगवेगळया भागात दोन चैनस्नॅचिंगच्या घटना घडल्या. या घटनेत सुमारे एक लाख रूपये किमतीचे मंगळसूत्र व सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गोरक्षनगर भागातील योगिता विजय बर्वे व त्यांची मुलगी साक्षी (रा.योग बिल्डींग,विजय अॅटो गॅरेज) या दोन्ही मायलेकी बुधवारी रात्री परिसरात फेरफटका मारत असतांना पहिली घटना घडली. बालाजी अपार्टमेंट समोरील कॉलनीरोडने मायलेकी पायी जात असतांना तोंडबांधून दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळय़ातील सोन्याचे पॅण्डल असलेले सुमारे ७५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले.
दुसरी घटना रामचंद्र नगर भागात घडली. सविता रमाकांत कुलकर्णी या रात्रीच्या सुमारास रामचंद्र नगरच्या दिशेने पायी जात असतांना नायरा पेट्रोलपंप भागात दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ््यातील मंगळसुत्र व सोनसाखळी असा सुमारे ३० हजार रूपये किमतीचा ऐवज हिसकावून नेला. याबाबत बर्वे यांच्या तक्रारीवरून पोलीस दप्तरी एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.