वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यामधील केलेला व्हिडीओ चांगलाच शेअर केला जात आहे. शेअर केलेल्या व्हिडीओत जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यातील पांढऱ्याशुभ्र बर्फाच्छादित ट्रॅकवरून रेल्वे दिमाखात धावताना दिसतेय. जमिनीपासून सर्वत्र एखादी बर्फाची चादर पांघरल्यासारखे हे सुंदर दृश्य दिसत आहे. रेल्वेमंत्र्यांनी शेअर केलेला हा सुंदर, नयनरम्य व्हिडीओ युजर्सना फार आवडला आहे. त्यावर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी हे खूप मनमोहक आणि खूप सुंदर असे दृश्य असल्याचे सांगितलं.
‘पृथ्वी वरील स्वर्ग’, ‘भारताचे, नंदनवन’ अशा उपमा आठवतात !!! कारण- हिवाळा ऋतूत या ठिकाणी सर्वत्र बर्फाची पांढरीशुभ्र चादर पसरलेली दिसते. हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होतात. या वर्षी उशिरा का होईना जम्मू-काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. हिमवृष्टीमुळे येथील तापमानात घट झाली आहे. जमिनीवर जणू बर्फाचा गालिचा पसरवल्याचा भास होत आहे. अशातच सध्या जम्मू-काश्मीरच्या गुलमर्ग, सोनमर्ग व पहलगाममध्ये जोरदार हिमवर्षाव झाला आहे. त्यात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.