नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात हळदीच्या कार्यक्रमात व्हिडीओ शुटींग करीत असतांना छायाचित्रकाराची बॅग चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या बॅगेत महागडा कॅमेरा व बॅटरी आणि चार्जर असा सुमारे दीड लाखाचा ऐवज होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौतम दामोदर दोंदे (रा.शिवाजीनगर,नाशिक पुणारोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दोंदे यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय असून गेल्या १८ जानेवारी रोजी रात्री ते श्रमिकनगर येथे हळदीच्या कार्यक्रमाची ऑर्डर करीत असतांना ही घटना घडली. हिंदी शाळेजवळील दत्त मंदिर परिसरात ते व्हिडीओ शुटींग करीत असतांना चंद्रकांत अडांगळे यांच्या घरपरिसरातील एका ओट्यावर ठेवलेली त्यांची कॅमेरा बॅग चोरट्यांनी चोरून नेली.
याबॅगेत फ्युजी फिल्म कंपनीचा एक लाख रूपये किमतीचा कॅमेरा,लेन्स, बॅट-या व चार्जकन्वर्टर असा सुमारे दीड लाख रूपये किमतीचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.