नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाखोंची कमाई करण्याचे आमिष दाखवून शहरातील तिघांना बारा लाखांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. टेलीग्रामच्या माध्यमातून प्रिपेड टास्क पूर्ण करण्याच्या मोबदल्यात ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवम दयानंद सुर्यवंशी (२१ रा.कृष्णाईनगर,कर्मा रेसि.जवळ) या युवकाने फिर्याद दिली आहे. सुर्यवंशी गेल्या ऑॅगष्ट महिन्यात इंटरनेटवर पारटाईम कामाचा शोध घेत असतांना टेलीग्राम व ८६०२७१०८८७ या व्हॉटसअप क्रमांकावरून भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी प्रिपेड टास्क पुर्ण केल्यास अल्पावधीत लाखो रूपयांची कमाई होईल असे आमिष दाखविण्यात आल्याने सुर्यवंशी याचा विश्वास बसला. यानंतर त्यास वेगवेगळया बँक खात्यात रकमा भरण्यास भाग पाडण्यात आले.
याच पध्दतीने शहरातील अंकिता रॉय आणि मिथून दाते यांचीही फसवणुक करण्यात आली असून संबधीतांनी टास्कच्या मोहापायी तब्बल ११ लाख ४३ हजार रूपयांची गुंतवणुक करूनही मोबदला व गुंतवणुकीची रक्कम न मिळाल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करीत आहेत.