इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट तसेच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यावर सकारात्मक चर्चा झाली. भाजप तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट, शिवसेनेचा शिंदे गट आणि काँग्रेस प्रत्येकी एक अशा जागा वाटून घेऊन निवडणूक बिनविरोध करणार आहेत. महायुतीच्या वाट्याला पाच जागा तर महाविकास आघाडीला एक जागा मिळणार आहे. येत्या २७ तारखेला राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावर एकमत झाले आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा गटाकडे आमदारांची संख्या कमी असल्याने ते या निवडणुकीत उमेदवार देणार नाहीत. राज्यसभेच्या सहा खासदारांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपणार आहे. कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांमध्ये भाजपचे तीन, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या एका खासदाराचा समावेश आहे. नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि व्ही. मुरलीधरन या भाजपच्या तीन सदस्यांचा, तर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, काँग्रेसचे कुमार केतकर, शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण हे निवृत्त होणार आहेत.
भाजपने राज्यसभेच्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, विनोद तावडे यांच्यासोबतच पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांना राज्यसभेवर पाठवण्याची चर्चा आहे. राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे यांनी चंदीगड आणि बिहारच्या सत्तांतरात बजावलेली भूमिकेची बक्षिसी त्यांना मिळणार आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर नाराज असलेल्या ओबीसी समजाची नाराजी दूर करण्यासाठी पंकजा यांना उमेदवारी दिली जाण्याची व्यूहनीती आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून पार्थ पवार किंवा अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे.