नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पवित्र अयोध्या नगरीला जाण्यासाठी हवाई संपर्काला चालना देण्याच्या आणि यात्रेकरूंचे येथील आगमन सुलभ करण्याच्या उद्देशाने, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम.सिंदिया यांनी आज उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीसाठी सुरु होत असलेल्या आठ नवीन विमानफेऱ्यांचे झेंडा दाखवून उद्घाटन केले. या आभासी पद्धतीने आयोजित उद्घाटन समारंभात उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच केंद्रोय नागरी हवाई वाहतूक तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे राज्यमंत्री जनरल (डॉ.)व्ही.के.सिंह (निवृत्त) देखील उपस्थित होते.
नव्याने सुरु झालेल्या या विमान फेऱ्या अयोध्येला मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, पाटणा, दरभंगा आणि बेंगळूरू या शहरांशी जोडणार आहेत. मुंबईहून अयोध्येला जाण्यासाठी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी निघालेले विमान अयोध्येला सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल तर अयोध्येहून सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी निघालेले विमान मुंबईत दुपारी एक वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. सदर विमान फेऱ्या दररोज उपलब्ध असणार आहेत.
अयोध्येतील राममंदिरात नुकत्याच पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहोळ्यानंतर अयोध्येला भेट देण्यासाठी नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे अयोध्येची पर्यटन क्षमता वाढली आहे आणि त्यातून या भागाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाचा नवा मार्ग तयार झाला आहे.