मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत माणसांना व पक्ष्यांना होत असलेली दुखापत, वीज वाहिन्या व सबस्टेशनवर फ्लॅश ओव्हर होऊन वीज पुरवठा खंडित होणे, धाग्यांमुळे गटारे, ड्रेनेज लाईन तुंबणे आदी समस्यांवर नियंत्रण आणण्यासाठी फौजदारी दंड प्रक्रिया संहीता, १९७३ मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये १० फेब्रुवारी २०२४ च्या मध्यरात्री पर्यंत प्लॅस्टिकपासून बनविलेला नायलॉन मांजा, कोणत्याही कृत्रिम पदार्थांच्या वापरामुळे पक्षांना व माणसांना गंभीर इजा होतात अशा पदार्थांच्या वापराला, विक्रीला व साठवणुकीवर बंदीचा आदेश जारी केला आहे.
मांजा किंवा नायलॉन धाग्यांमुळे दुर्मिळ आणि लुप्तप्राय प्रजाती म्हणून वर्गीकृत केलेल्या पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी मांजावरील बंदी आवश्यक आहे. मांजा किंवा सिंथेटिक धाग्यामुळे अनेकदा वीज वाहिन्या व सबस्टेशनवर फ्लॅश ओव्हर होतो. ज्यामुळे ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होतो, अपघात होतात, वन्यजीवांना दुखापत होऊ शकते त्यामुळे अशा धाग्यांचा वापर टाळणे आवश्यक आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये दंडनीय असेल, असे पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद आहे.