जुगार खेळणा-या चार जणांच्या पोलीसांनी कारवाई करत रोकडसह साहित्य केले जप्त
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुगार खेळणा-या चार जणांच्या पोलीसांनी कारवाई केली आहे. ठाकरे गल्लीतील दुर्गा मंदिर भागात उघड्यावर हे चारही जण जुगार खेळत होते. त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अमीन पिर मोहम्मद शेख (३२ रा.खडकाळी),सुरेश भिवा कोरगा (५३ रा.कालीकानगर,दिंडोरीरोड),अंबादास चंद्रकांत केदारे (३१ रा.सुंदरबन कॉलनी वसाहत,लेखानगर) व हरिभाऊ देविदास वानखेडे (२८ रा.पंचशिलनगर,गंजमाळ) अशी अटक केलेल्या जुगारींची नावे आहेत. याबाबत पोलीस अंमलदार दयानंद सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. ठाकरे गल्लीतील दुर्गा माता मंदिर परिसरात काही जण उघड्यावर जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार भद्रकाली पोलीसांनी छापा टाकला असता संशयित कल्याण मटका नावाचा जुगार खेळतांना मिळून आले. या कारवाईत १ हजार ४५० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून अधिक तपास हवालदार साळुंके करीत आहेत.
युवतीच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वारांनी हिसकावून नेला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फोनवर बोलत रस्त्याने पायी जाणा-या युवतीच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना खुटवडनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साक्षी संतोष कातकाडे (१९ रा.राजरत्ननगर,पवननगर सिडको) या तरूणीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. साक्षी कातकाडे ही मंगळवारी (दि.३०) खुटवडनगर भागात गेली होती. सीटू भवन परिसरातून ती मोबाईलवर बोलत रस्त्याने पायी जात असतांना पाठीमागून अॅक्टीव्हावर आलेल्या त्रिकुटापैकी एकाने तिच्या हातातील सुमारे १२ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक नाईद शेख करीत आहेत.
पान स्टॉल चालकास पोलीसांनी केली अटक
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंदी असतांनाही गुटख्याची विक्री करणा-या पान स्टॉल चालकास पोलीसांनी अटक केली. संशयिताच्या ताब्यातून सुमारे १० हजार रूपये किमतीचा पान मसाला व सुगंधी तंबाखूचा साठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर फत्ते मोहम्मद खान (४८ रा. अश्रफिया कॉलनी,एकलहरा रोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित गुटखा विके्रताचे नाव आहे. खान याचे नाशिकरोड येथील शिवाजी महाराज पुतळ््याजवळ समीन पान शॉप नावाचे दुकान आहे. या ठिकाणी राजरोसपणे गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.३१) अन्न सुरक्षा अधिकारी सायली पटवर्धन यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात संशयित गुटखा विक्री करतांना मिळून आला.
दुकान झडतीत त्याच्या ताब्यात विविध प्रकारचा पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचे पुडे आढळून आले असून या कारवाईत सुमारे दहा हजार ८७ रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पटवर्धन यांच्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक आडके करीत आहेत.