नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर ड्रोनसंदर्भातील कोर्स करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्यावतीने आता ड्रोन संदर्भातील तीन कोर्सेस सुरू होत आहेत. याबाबत विद्यापीठाने ड्रोन कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे. येत्या काही दिवसातच हे कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत.
जमिनीपासून काही उंचीवर जाऊन फोटो तसेच व्हिडिओ चित्रण करणे तसेच विविध प्रकारच्या कामकाजांसाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा या ड्रोनकडे सध्या सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे यासाठी मुक्त विद्यापीठ आणि ड्रोन कॉर्पोरेशन यांनी संयुक्तरित्या पुढाकार घेतला आहे. म्हणूनच दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. विद्यापीठामध्ये यासंदर्भात छोटेखानी समारंभ झाला. त्याप्रसंगी कुलगुरु प्रा संजीव सोनावणे, प्र कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. दिलीप भरट, आरोग्य विद्याशाखेचे संचालक डॉ जयदीप निकम, ड्रोन कॉर्पोरेशनचे संचालक कॅप्टन अक्षय आर्ते आणि डॉ, राहुल बोराडे हे उपस्थित होते.
हे कोर्सेस होणार सुरू
ड्रोन सिस्टीम इंट्रोडक्शन प्रोग्राम (कालावधी २ दिवस), ड्रोन सिस्टीम इंटरमिडीएट प्रोग्राम (कालावधी ६ दिवस), ड्रोन सिस्टीमम अडव्हान्स प्रोग्राम (कालावधी १ महिना) हे तीन कोर्सेस येत्या काही दिवसातच सुरू होणार आहेत. तर, डीजीसीएच्या मान्यतेने ड्रोन पायलट लायसेन्स कोर्स लवकरच सुरू केला जाणार आहे.
येथे मिळणार प्रशिक्षण
ड्रोन कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कार्यालय कॉलेजरोड-महात्मानगर येथील रामराज्य-१ बिल्डींगमध्ये आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रवेश व नोंदणी करता येईल. त्यानंतर कंपनीचे तज्ज्ञ राज्याच्या विविध भागात प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणार आहेत. कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.
ड्रोन कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडविषयी
कॅप्टन अक्षय आर्ते आणि डॉ. राहुल बोराडे यांनी या कंपनीची स्थापना केली आहे. आर्ते यांनी अमेरिकेत शिक्षण घेतले आहे. तसेच, ते एअरबस विमानाचे पायलट आहेत. त्यांना एव्हिएशन क्षेत्राचा उत्तम अनुभव आहे. तर, डॉ. बोराडे यांनी एव्हिएशन क्षेत्रात संशोधन करुन पीएचडीची पदवी संपादन केली आहे. ओझर विमानतळावर ते कार्यरत आहेत. ग्राऊंड हँडलींग सह एव्हिएशन क्षेत्रात त्यांचा अनुभव आहे. संजय रजानी आणि अजय चंद्रा यांचे कंपनीला मार्गदर्शन लाभते आहे.