नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ आज केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन या संसदेत सादर करत असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसापूर्वी सीतारामन व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या उपस्थितीत नॉर्थ ब्लॉक येथे “लॉक-इन” प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पारंपरिक हलवा समारंभ आयोजित केला होता.
१ फेब्रुवारी २०२४ रोजी अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ सादर केला जाणार आहे. राज्य घटनेत विहित केल्याप्रमाणे, वार्षिक वित्तीय विवरण (सामान्यपणे अर्थसंकल्प म्हणून ओळखले जाते), अनुदानाच्या मागण्या, वित्त विधेयक यांसह सर्व केंद्रीय अर्थसंकल्पीय दस्तावेज “केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल अॅप” वर उपलब्ध असेल.
डिजिटल सुविधेचा सर्वात सोपा प्रकार वापरून संसद सदस्य (खासदार) आणि सामान्य लोकांना हे अर्थसंकल्प दस्तावेज सहज पाहता येतील. हे दोन भाषांमध्ये (इंग्रजी आणि हिंदी) आहे आणि Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. केंद्रीय अर्थसंकल्प वेब पोर्टल (www.indiabudget.gov.in) वरून देखील हे अॅप डाउनलोड करता येईल. १ फेब्रुवारी २०२४ रोजी संसदेत केंद्रीय अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण झाल्यानंतर अर्थसंकल्पाची कागदपत्रे मोबाईल अॅपवर उपलब्ध होतील.








