इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली : अब की बार मोदी सरकारऐवजी अब की बार संघटनेवर भर, असा नारा भाजपने दिला आहे. येत्या निवडणुका पाहता भाजपने मोदींच्या प्रतिमेवर भर देण्याऐवजी पक्षाचे संघटन बांधण्यावर लक्ष दिले आहे.
येत्या काळात मध्य प्रदेश, राजस्थानसह काही राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार, प्रत्येक राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अशात भाजपने स्वत:च्या रणनितीमध्ये बदल केला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. भाजपासाठी या पाचही राज्यांतील निवडणुका महत्त्वाच्या ठरतात. या पाच राज्यांच्या निकालावरून आगामी लोकसभा निवडणुकांची वातावरण निर्मिती भाजपाला करता येऊ शकते, तसेच भाजपा संघटनेसाठीही हे निकाल महत्त्वाचे ठरणार आहेत.
२०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाचही राज्यांत भाजपाचा पराभव झाला होता. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता. तेलंगणात भारत राष्ट्र समितीचे सरकार पुन्हा आले होते आणि ईशान्य भारतातील मिझोराम राज्यात मिझो नॅशनल फ्रंट या पक्षाचा विजय झाला होता. मध्य प्रदेशात काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे २०२० साली भाजपाने सत्तास्थापन केली होती, तर मिझोराममध्ये एमएनएफ पक्षाने एनडीएला पाठिंबा दिलेला आहे.
भाजपाकडून आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली तर त्यामध्ये केंद्रातील अनेक बडे नेते निवडणुकीत उतरविल्याचे दिसून येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यांमध्ये नव्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्याचवेळी निवडणुका होत असलेल्या सर्व राज्यांत असे दिसून येत आहे की, भाजपाने स्थानिक नेतृत्वाऐवजी पक्षाच्या नावावर मतदान मागण्यास प्राधान्य दिले आहे.
पक्षाच्या नावाने घालणार साद
गेल्या दोन निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर लढण्यात आल्या. मात्र, आता स्वत: मोदीदेखील मी कुठवर निवडणुका जिंकवून देणार असे सांगत असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे भाजपनेही पक्षाच्या नावावर मत मागण्यास सुरुवात केली आहे.