नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संसदेचे अल्पकालीन अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झाले. परंपरेनुसार या अधिवेशनाची सुरूवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली.
नव्या संसद भवनात प्रथमच आपले विचार मांडण्याचा आनंद वाटत असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत काळाच्या प्रारंभिक दिवसांत नव्या संसद भवनाच्या निर्मितीचे काम पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले.
नवे संसद भवन ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ या भावनेच्या उत्साहाने ओतप्रोत भरलेले असून ही इमारत भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचे मूर्तीमंत स्वरूप आहे, अशी भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली.
ही इमारत स्वातंत्र्याच्या अमृत काळात, विकसित भारताला आकार देणाऱ्या धोरणांवर होणाऱ्या फलदायी चर्चेची साक्षीदार बनेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.