नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज नाशिक डिफेन्स इनोव्हेशन सेंटर आयोजित एमएसएमई कॅपॅबिलीटी असेसमेंट ड्राईव्हची घोषणा करण्यात आली. या अभियानाद्वारे संरक्षण क्षेत्रात लागणाऱ्या विविध उत्पादनांसाठी वेंडर डेव्हलपमेंट आणि नवीन संशोधनाला मदत व्हावी या दृष्टीने तसेच आत्मनिर्भर भारत या अभियानात भाग घेण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या १६ विविध कंपन्या तसेच आर्मी नेव्ही व एअर फोर्स या तीनही विभागांसाठी आवश्यक ती क्षमता नाशिक व महाराष्ट्रातील सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांमध्ये असल्याची खात्री केली जाईल.
सदर अभियानात सुमारे ३०० विविध प्रकारचे कंपन्या सहभागी होतील व संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कंपन्यांचे अधिकारी या कंपन्यांची क्षमता पाहून त्यांच्याबरोबर विविध उत्पादनासाठी करार करता येतील. यासाठी आत्मनिर्भर भारत नेटवर्क म्हणजेच एबीएन नेटवर्क या स्टार्टअपचे मदत घेऊन वर्चुअल कॅपॅबिलिटी शोकेस तयार होईल. संरक्षण मंत्रालयाच्या व एमएसएमइ मंत्रालयाच्या सूचनेनुसार सर्व ग्राहक या ड्राइव्हमध्ये भाग घेऊन क्षमता असलेल्या कंपन्यांना निवडतील. अशा प्रकारचा अभिनव उपक्रम प्रथमच केल्या जात असून याला प्रतिसाद द्यावा असे आवाहन संरक्षण मंत्रालयाचे प्रोग्राम डायरेक्टर डॉ.श्री व्ही के राय यांनी केले.
सदर कार्यक्रम डॉक्टर मुंजे इन्स्टिट्ट येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन संरक्षण मंत्रालयाचे आयडेएक्स विभागाचे प्रोग्राम संचालक डॉ.श्री वी के राय आणि एचएएलचे उपमहाव्यवस्थापक डॉ. अजित भांदक्कर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ .प्रशांत पाटील यांनी केले.
डिफेन्स इनोवेशन सेंटरची कार्यप्रणाली प्रेझेंटेशन द्वारे संचालक युवराज वडजे यांनी उपस्थित उद्योजकांना सांगितली.प्रदीप पेशकार, संचालक नाशिक डिफेन्स इनोव्हेशन सेंटर यांनी एमएसएमए कॅपॅबिलिटी असेसमेंट ड्राइवची संकल्पना विशद केली. तसेच कंपन्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या विविध कंपन्यांसमोर कशा प्रकारे प्रेझेंटेशन करावे हे दाखवले. हा उपक्रम औद्योगिकक्षेत्रासाठी कशा प्रकारे उपयोगी असेल आणि अनेक प्रकारे सरकारी डिफेन्स कंपन्यांचे काम मिळवून देण्यासाठी मदत करेल हे सांगितले. डॉ. वि. के राय यांनी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय सायन्स अँड टेक्नॉलॉजी नीती आयोग यांच्या वतीने स्टार्टअप तसेच लघुउद्योजकातील संशोधनासाठी स्वदेशीकरणासाठी व संशोधन सिद्ध झाल्यानंतर उत्पादन सुरू करेपर्यंत विविध योजना, दहा लाखापासून ते दहा कोटी रुपये पर्यंतच्या अनुदानाच्या तसेच कर्जाच्या विविध योजना सांगितल्या जेणेकरून संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होण्याचा मार्ग सुकर होऊन भारतीय लघुउद्योग या क्षेत्रात स्थिरावतील.
तसेच डॉ. अजित भांदक्कर यांनी हिंदुस्तान ॲरोनेटिक्स लिमिटेड ची सध्या आवश्यकता असलेल्या उत्पादनांची यादी व स्वदेशीकरणासाठी भागीदार निवडण्याची कार्यप्रणाली सांगितली. सदर कार्यक्रमासाठी डॉक्टर मुंजे इन्स्टिट्यूट व व हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे जॉइंट सेक्रेटरी आनंद देशपांडे व प्राचार्य डॉक्टर प्रीती कुलकर्णी या उपस्थित होत्या. निशिकांत अहिरे, निखिल तापडिया, डॉ.ओमप्रकाश कुलकर्णी, आनंदराव सूर्यवंशी ,नारायणराव क्षीरसागर, सचिन तरटे, सुहास कुलकर्णी तसेच अनेक नामवंत उद्योजक आणि उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते .