नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात मंगळवारी तीन जबरीचोरीच्या घटना वेगवेगळ्या भागात घडल्या. या प्रकरणी पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. या तीन घटनेत एका पादचारीच्या गळयातील सोनसाखळी व तरूणीच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेला. तर सिडकोत ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करणा-या वाहन चालकास बेदम मारहाण करीत दुकलीने त्याच्या खिशातील रोकड लांबविली.
पहिली घटना पेठरोड भागात घडली. प्रियंका हर्षवर्धन नेटावटे (२३ रा.पवार मळा, पांडूरंग कॉलनी विठाई नगर) यांनी फिर्याद दिली आहे. नेटावटे या सोमवारी (दि.२९) कंपनीत कामावर गेल्या होत्या. सायंकाळी अश्वमेधनगर येथे रिक्षातून उतरून त्या मोबाईलवर बोलत रस्ताने पायी आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. महालक्ष्मी किराणा दुकानाजवळ पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला.
दुस-या घटनेत प्रविण एकनाश सुर्यवंशी (४१ रा.रामकृष्णनगर,मखमलाबादरोड) हे सोमवारी (दि.२९) रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. शांतीनगर परिसरातून चक्कर मारून ते आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. कृष्णकुंज रो हाऊस समोरून ते पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या मानेवर थाप मारून गळ््यातील सुमारे ५९ हजार रूपये किमतीचे सोनसाखळी हातोहात लांबविली. दोन्ही गुह्यांप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात वेगवेगळे जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास उपनिरीक्षक घडवजे करीत आहेत.
तिसरी घटना सिडकोतील सिम्बॉयसिस स्कुल भागात घडली. याबाबत संदिप तुकाराम बाविस्कर (४३ रा.सिंहस्थनगर सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बाविस्कर रूग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करणा-या वाहनावरील चालक असून, मंगळवारी (दि.३०) ते औद्योगीक वसाहतीतील पिनॅकल ऑक्सिजन इंडस्ट्रीज या कारखान्यात गेले होते. वाहनात सिलेंडरचा साठा भरून ते वितरणासाठी निघाले असता ही घटना घडली. पाथर्डी फाटा ते अंबड मार्गावरील सिम्बॉयसिस स्कुल भागातून ते आपले वाहन घेवून जात असतांना दुचाकीवरून आलेल्या प्रविण शिंगटे व त्याच्या साथीदाराने आम्हाला कट का मारला या कारणातून वाद घालत चालक बाविस्कर यांना वाहनाखाली खेचले. या ठिकाणी शिवीगाळ करीत त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील दोन हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून दोघांनी पोबारा केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक किरण शेवाळे करीत आहेत.