नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जल समृद्ध ग्राम स्पर्धा २०२२-२३ चे ग्रामपंचायत निहाय जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले असून या स्पर्धेत नाशिक विभागात नाशिक जिल्ह्यातील ३ व जळगाव जिल्ह्यातील ३ ग्रामपपंचायतींना पुरस्कार प्राप्त झाले आहेत, असे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अटल भूजल योजनेचे सहसंचालक तथा प्रकल्प समन्वयक डॉ. प्रवीण कथने यांनी कळविले आहे.
लोकसहभागाद्वारे भूजलाचे संनियंत्रण करणे, जलसुरक्षा आराखडा तयार करणे व त्यामध्ये समाविष्ट कामांची अंमलबजावणी करणे, राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अभिसरण होणे, यासाठी ग्रामस्तरावर सुदृढ वातावरण निर्मितीसाठी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
अटल भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना पारितोषिक जाहीर झाले आहे. त्यामध्ये वडगाव पिंगळा (ता.सिन्नर) जिल्हा स्तरावर ५० लाखांचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. दातळी (ता. सिन्नर) द्वितीय क्रमांकासह ३० लाख तर, कनकापूर (ता. देवळा) ग्रामपंचायतीला २० लाखांचा तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना पारितोषिक जाहीर झाले आहे. त्यामध्ये सावखेडा बुटुक (ता. रावेर) जिल्हा स्तरावर ५० लाखाचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. उंदीरखेडे (ता. पारोळा) द्वितीय क्रमांकासह ३० लाख तर, खिरोदा प्र. यावल (ता. रावेर) ग्रामपंचायतीला २० लाखांचा तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
योजनेत समाविष्ट पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, जालना, लातूर, धाराशिव, बुलढाणा, अमरावती आणि नागपूर या १२ जिल्ह्यांतील २७० ग्रामपंचायतींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. एकूण ५५० गुणांसाठी स्पर्धा झाली होती. स्पर्धेचे मूल्यांकन उपविभाग स्तर, जिल्हास्तर व राज्यस्तर या तीन स्तरांवर करण्यात आले.