नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या एका व्यापा-यास तब्बल सव्वा कोटी रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सातपूर औद्योगीक वसाहतीतील बॅकेकडील तारण प्रॉपर्टी लिलावात अल्पदरात घेवून देतो अशी बतावणी करुन ही फसवणूक करण्यात आली आहे. दीड वर्ष उलटूनही प्रॉपर्टी न मिळाल्याने व्यापा-याने पोलीसात धाव घेतली असून, पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ललीत शशिकांत निकम (रा.इंदिरानगर) असे संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत भाऊसाहेब ठाणसिंग गिरासे (रा.कैलासनगर,पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. गिरासे व्यापारी असून, सन.२०२२ मध्ये संशयिताने पंचवटीतील क्रांतीनगर भागात राहणा-या रामदास केकाण यांच्या घरी बोलावून घेतले होते. यावेळी संशयिताने पंजाब नॅशनल बँककडे सातपूर औद्योगीक वसाहतीतील प्लॉट नं. १०९ – ३ यासी क्षेत्र १३८५ चौमी या भूखंडासह त्यावरील ७६५.५३ चौमी आरसीसी बांधकाम तारण आहे. या प्रॉपर्टीचा लिलाव होणार असून ही मिळकत अल्पदरात मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
गिरासे यांनी मिळकत खरेदीची तयारी दर्शविताच संशयिताने खरेदी विक्री साठी लागणारी बनावट कागदपत्र त्यांना दाखविली. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. याबदल्यात १७ जुलै २०२२ ते २१ मार्च २०२३ दरम्यान गिरासे यांनी १ कोटी २७ लाख ६५ हजाराची रक्कम निकम याच्या स्वाधिन केली. मात्र दीड वर्ष उलटूनही मिळकत त्यांच्या पदरात पडली नाही. आपली मोठी आर्थिक फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पंचवटी पोलीसात धाव घेतली असून हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करणाात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक घोरपडे करीत आहेत.