नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आनंदाची बातमी समोर आली असून त्यात स्मार्टफोनचे दर कमी होणार आहे. देशात मोबाईल फोन तयार करण्यासाठी वापरले जाणारे पार्ट बाहेरुन मागवले जातात. त्याची किंमत त्यामुळे जास्त असते. त्यातच आयात शुल्क जास्त असल्यामुळे किंमत अजून वाढते. पण, केंद्र सरकारने आयात शुल्कामध्ये बदल केले आहे. एका अधिसूचनेद्वारे ३ श्रेणींमध्ये हे बदल केले आहेत. मोबाईल फोनच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर लागू असलेल्या आयातशुल्क १५ टक्केववरून १० टक्के करण्यात आले आहे.
मोबाइल फोनच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूवर आतापर्यंत १५ टक्के शुल्क आकारले जात होते ते आता १० टक्के दराने आकारले जातील. उदाहरणे: बॅटरी कव्हर, फ्रंट कव्हर, मिडल कव्हर, मेन लेन्स, बॅक कव्हर, जीएसएम अँटेना, पीयू केस, सीलिंग गॅस्केट, सिम सॉकेट, स्क्रू, प्लास्टिक आणि धातूच्या इतर यांत्रिक वस्तूंचा समावेश आहे.
हे आयात शुल्क कमी झाल्यामुळे देशात स्मार्ट फोनच्या किंमती ब-याच कमी होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. त्याअगोदरच ही आनंदाची बातमी समोर आली आहे.