इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रांचीःझारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आज ‘ईडी’ अटक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे झारखंडच्या आमदारांची एक तातडीची बैठक घेण्यात आली. त्यात बी प्लॅन तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लावायची, हे काँग्रेसने ठरवले असल्याचे समजते.
‘ईडी’च्या तपासावर काँग्रेस नेते अजयकुमार म्हणाले, की ‘ईडी’-‘सीबीआय’ भाजपला हवे तसे करतात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे त्रास दिला जातो आणि खोट्या केसेसमध्ये अडकवले जाते. या नऊ वर्षात भाजपच्या एका मंत्र्यावर छापेमारी झाली आहे का? निवडणुका येत आहेत, त्यामुळे सगळ्यांना फोडायचे आहे. मी जेपी नड्डा यांना प्रत्येक राज्यातील भाजप कार्यालयात केंद्रीय तपास संस्थांसाठी कार्यालय तयार करण्याचा आग्रह करेन. दिल्लीतील भाजपचे मुख्यालय स्वतंत्र ‘ईडी’ कार्यालय आहे.
भाजपने सोरेन यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे प्रवक्ते प्रतुल शाह देव यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, की झारखंडमध्ये जे काही घडले, ते आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक विकल्या गेलेल्या कादंबरीच्या कथेसारखे दिसते. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री आपली पूर्ण सुरक्षा सोडून ४० तास बेपत्ता राहतो, हे अभूतपूर्व आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधीही राज्यप्रमुख किंवा सरकारप्रमुख ४० तासांसाठी गायब झाले नाहीत.
दरम्यान, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर राज्यमंत्री बन्ना गुप्ता म्हणाले, की सर्व आमदार सोरेन यांच्याशी पाठीशी आहेत. काँग्रेस कार्यकर्ते एकजूट दाखवतील. सर्व काही सामान्य आहे, काळजी करण्याची गरज नाही. सोरेन यांची चौकशी करण्यापूर्वी त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन या झारखंडच्या मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. दरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी दावा केला, की झारखंडमधील कल्पना सोरेन यांच्या नावावर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमत होऊ शकले नाही. सीता सोरेन आणि बसंत सोरेन बाहेर पडले. सभेला केवळ ३५ आमदार उपस्थित होते. आमदारांनी साध्या कागदावर सह्या केल्या.