इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या असतांना बुधवारपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात अगोदर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषणानं होईल. त्यात त्या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. त्यानंतर गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आगामी आर्थिक वर्षाचा हंगामी अर्थसंकल्प सादर करतील. हे अधिवेशन ९ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंगळवारी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केले होते. लोकसभेचे सभापती आणि राज्यसभेच्या अध्यक्षांच्या परवानगीनं सरकारनं सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला तयार आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावे आणि फलकबाजी करू नये असे आवाहन संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले. हिवाळी अधिवेशनात निलंबित झालेल्या सदस्यांचे निलंबन मागे घेण्याची विनंतीही अध्यक्ष आणि सभापतींना केल्याची माहिती त्यांनी दिली.
या अधिवेशनात बेरोजगारी, महागाई आणि देशावरच्या वाढत्या कर्जाचा मुद्दा उपस्थित करू असे काँग्रेस नेते प्रमोद तिवारी म्हणाले. या बैठकीला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, पीयूष गोयल आणि अर्जून राम मेघवाल यांच्यासह काँग्रेस नेते के. सुरेश, शिवसेना खासदार राहुल शेवाळे, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय आणि सुखेन्दु शेखर रॉय, संयुक्त जनता दलाचे राम नाथ ठाकूर, द्रमुकचे टी. आर. बालू आणि माकपाचे पी. आर. नटराजन यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.