इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक : नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मागील वर्षी जिल्हा परिषद व नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टर या संस्थेच्या वतीने उमेद शोध नाविन्यतेचा हा उप्रकम राबवण्यात आला होता. या उप्रक्रमात ग्रामीण भागातील नागरिकांसाठी स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेच्या माध्यमातून तीन नाविन्यपूर्ण संकल्पनांची निवड करून या संकल्पना प्रत्यक्षात आमलात आणण्यासाठी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या वतीने सहकार्य केले गेले. यातील अविष्कार संजय अनार्थे या युवकाच्या संकल्पनेतून तयार झालेल्या यंत्राचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष मनीष कोठारी, संचालक विक्रम सारडा, नरेंद्र गोलिया, नरेंद्र बिरार, हेमंत राठी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) वर्षा फडोळ, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये प्रचंड प्रतिभा असून त्यास व्यासपीठ व संधी उपलब्ध होणे व त्यांच्याकडील संकल्पनांचे रूपांतर व्यवसायात होणे गरजेचे आहे या विचारातून नाशिक इंजिनीरिंग क्लस्टर व जिल्हा परिषद यांनी परस्पर सहकार्यातून मागील वर्षी नाशिक मधील दिंडोरी, इगतपुरी, नाशिक, निफाड, सिन्नर व त्र्यंबकेश्वर या सहा तालुक्यांमधील ग्रामीण भागात नाविन्यपूर्ण उप्रक्रमांचा शोध घेण्यात आला. नाशिक इंजिनीरिंग क्लस्टर आणि जिल्हा परिषदेच्या वतीने पंचायत स्तरावर ११ ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यातील ३ संकल्पनांची निवड ही व्यावसायिक निमिर्तीला चालना देण्यासाठी करण्यात आली होती त्यानुषंगाने भूमिपुत्र एन्टरप्राईजेसच्या माध्यमातून रोपण यंत्राची निर्मिती ही करण्यात आली आहे असे एस. के. माथुर यांनी सांगितले.
ग्रामीण भागात अनेक समस्यांना तोंड देत ग्रामीण भागातील नागरिक हे प्रत्येक समस्येवर पर्याय शोधत त्यावर मात करत असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नाविन्यपूर्ण संकल्पना वाव देण्याचा जिल्हा परिषद व नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचा मानस आहे, मागील वर्षी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व सद्यस्थितीतील आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या कार्यकाळात हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला होता या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील संकल्पनांना निश्चितच चालना मिळत आहे. यावर्षी देखील ग्रामीण भागातील नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन ग्रामीण भागाच्या विकासासाठी उपयुक्त असणा-या संकल्पना नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या व्यासपीठावर सादर कराव्या असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर व जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आयडिया स्पार्क २०२३ – , ‘आयडिया स्पार्क २०२३’ हे या वर्षाचे इनोव्हेशन चॅलेंज आहे हे सद्यस्थितीत सुरु असून नवउद्योजकांना व नवनिर्मितीचा ध्यास असणाऱ्यांना अर्ज करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. यासाठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर असून प्रवेश मोफत व ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असून अर्ज सादर करण्यासाठी www.nec.org.in या वेबसाईट ला भेट द्या असे आवाहन नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या वतीने करण्यात आले होते.