नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शिक्षणतज्ञ सतनाम सिंग संधू यांचे नाव राज्यसभेसाठी निर्देशित केले. एका शेतकऱ्याचा पुत्र म्हणून जन्माला आलेले सतनाम सिंग संधू हे आज भारतातील अग्रगण्य शिक्षणतज्ञांपैकी एक म्हणून नावारूपाला आले आहेत. स्वतःचे शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागल्यामुळे, शेतकरी असलेल्या संधू यांनी वर्ष २००१ मध्ये मोहालीमध्ये लंद्रन इथे, चंदीगड ग्रुप ऑफ कॉलेजेस (सीजीसी) या संस्थेची पायाभरणी करत जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थेची स्थापना हे जीवनाचे ध्येय निश्चित केले.
त्यानंतर आणखी एक पाऊल पुढे टाकत संधू यांनी वर्ष २०१२ मध्ये चंदीगड विद्यापीठाची स्थापना केली. या संस्थेने क्यूएस जागतिक क्रमवारी 2023 मध्ये आशियातील खासगी विद्यापीठांच्या श्रेणीत प्रथम स्थान मिळवले आहे. आयुष्यातील सुरुवातीच्या काळात आलेल्या अडचणींनी चंदीगड विद्यापीठाचे कुलगुरू संधू यांना एक खंबीर मात्र सहृदय व्यक्ती म्हणून घडवले. याचा परिणाम म्हणून दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी धडपडणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना त्यांनी आजवर आर्थिक मदत केली आहे.
तसेच ‘इंडियन मायनॉरीटीज फाउंडेशन’ आणि न्यू इंडिया डेव्हलपमेंट (एनआयडी) या त्यांच्या दोन बिगर सरकारी संस्थांच्या माध्यमातून आरोग्य तसेच स्वास्थ्य सुधारण्यासाठी तसेच सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी देखील ते मोठ्या प्रमाणात समाजसेवी उपक्रमांमध्ये सक्रियतेने सहभागी होत असतात. राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी त्यांनी देशात उल्लेखनीय कार्य केले असून परदेशातील भारतीय समुदायासोबत एकत्र येऊन देखील मोठ्या प्रमाणात काम केले आहे.