मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्थानिक नवोदित युवकांमधील कौशल्य विकास वाढवणे, प्रत्येकाच्या हाताला रोजगार देणे, कौशल्य विषयक अभ्यासक्रमांच्या बाबत जनजागृती रोजगारक्षम युवक-युवतींची नोंदणी व्हावी यासाठी विदर्भातील आठ जिल्ह्यांत “कौशल्य रथ” च्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि पुष्पांचल फाउंडेशनतर्फे आयोजित “कौशल्य रथ” चे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यानी हिरवी झेंडीं दाखवून केले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त आयुक्त अनिल सोनवणे, पंचशील फाउंडेशनचे संचालक गौरांग पांडे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ‘कौशल्य रथ’चा प्राथमिक उद्देश रोजगारक्षमता आणि उद्योजकता वाढवण्यासाठी विदर्भातील आठ जिल्ह्यातील युवकाना करिअर मार्गदर्शन करणे, त्यासंदर्भात कौशल्य प्रशिक्षण देणे हा आहे. या उपक्रमामुळे वंचित घटकांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल.
कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले की, विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये विविध कौशल्य क्षेत्रीय परिषदा यांच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या कौशल्य विषयक अभ्यासक्रमासाठी युवक युवतींची नोंदणी करणे आणि कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी प्रवृत्त करणे याकरिता ‘कौशल्य रथ’ महत्त्वाची भूमिका बजावतील. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योग विकास अभियानांतर्गत नियोक्ते आणि नोकरी शोधणारे यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी व्यक्तींसाठी ‘कौशल्य रथा’द्वारे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये पाच बसेसचा वापर करून महाविद्यालयांमध्ये थेट नावनोंदणी सत्रे आयोजित केली जाणार असल्याची श्री. लोढा यांनी सांगितले.