इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘इंडिया’ आघाडीची साथ सोडल्यानंतर महाराष्ट्रात आज महाविकास आघाडीची बैठक नरिमन पॉईंट येथील ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये दुपारी झाली. या बैठकी बाबत ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी माहिती दिली. या बैठकीत महाविकास आघाडीने महायुतीविरोधात छोट्या पक्षांनाही सोबत घेण्याचे धोरण ठरवले. वंचीत बहुजन आघाडीचा आज महविकास आघाडीत समावेश करण्यात आला आहे. ॲड.बाळासाहेब आंबेडकर हे २ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील. वंचीतमुळे देशातील हुकूशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल असेही त्यांनी सांगितले.
या महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खा. विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड हे या बैठकीला उपस्थित होते.
महायुतीला रोखण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र लोकसभा निवडणूक लढणार असून त्यासाठी जागावाटप करण्यात येणार आहे. आतापर्यंत ३५ हून अधिक जागांवर तडजोड झाली आहे. आजच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर येणार नसले, तरी त्यांचे प्रतिनिधी म्हणून धैर्यवर्धन पुंडकर उपस्थितीत होते. पण, त्यांना एक तास हॅाटेलमध्येच वाट बघावी लागल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर खा. राऊत यांनी काहीतरी गैरसमज झाला असे सांगितले.