इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठी अभिनय सृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि माझे मित्र अशोक सराफ यांना राज्य सरकारकडून २०२३ चा महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन असे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे.
मराठी हिंदी-चित्रपट आणि नाटकांमधून त्यांनी आजवर अनेक विविधरंगी भूमिका साकारत आपल्या अप्रतिम अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. विनोदाच्या ‘टायमिंग’साठी ते खूप प्रसिद्ध आहेत. चाहत्यांमध्ये ‘अशोक मामा’ म्हणून लोकप्रिय असलेले अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा मलाही योग आला.
सुरुवातीपासूनच अभिनयाचे आकर्षण असल्याने मी सामाजिक कामाबरोबरच संधी मिळेल तेव्हा आपली अभिनयाची हौस भागविण्याचा प्रयत्न केला. दैवत, नवरा-बायको या चित्रपटांमधून मी छोट्या भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे दोन्ही चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या निमित्ताने या दिग्गज अभिनेत्याचे काम जवळून पाहता आले.
ते आजही कला क्षेत्रात सक्रिय आहेत आणि मराठी चित्रपट, नाटकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. हा पुरस्कार म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या अष्टपैलू अभिनयाचा आणि कामाचा उचित सन्मान आहे. यापुढेही त्यांनी याप्रमाणेच कलेची सेवा करत रहावी आणि त्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशा शुभेच्छा!