इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. ही अधिसूचना काढण्याबाबतचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत झाला नाही. मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत्या २० फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसींच्या विराट सभेचे आयोजन केल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. आज राज्यातील विविध ओबीसी संघटनांबरोबर वडेट्टीवार यांची बैठक झाली.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, गृहमंत्री म्हणतात भाजप आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. केंद्रीय मंत्री राणे म्हणतात स्वाभिमानी मराठा समाज कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. मुख्यमंत्री म्हणतात की, आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील. मग, गृहमंत्री म्हणतात सरसकट गुन्हे मागे घेता येणार नाहीत. सरकारचं काय चाललंय ते सरकारमधील मंत्र्यांना तरी कळतंय का? सरकार मुद्दाम ओबीसी विरूद्ध मराठा हा वाद निर्माण करून दोन्ही समाजामध्ये संशयाचे वातावरण निर्माण करत आहे.