वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
समुद्र पर्यटनाचे आणि समुद्र प्रवासाचे सर्वांनाच आकर्षण असते. त्यातही क्रूझ हा या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. आता जगातील सर्वात मोठ्या क्रूझने आपला प्रवास सुरू केला आहे. रॉयल कॅरिबियन कंपनीच्या ‘आयकॉन ऑफ द सी’ नावाच्या क्रुझने शनिवारी मियामी बंदरातून आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे. या क्रुझची सध्याची प्रवासी क्षमता तब्बल ५,६०० एवढी आहे.
एखाद्या छोट्या गावाप्रमाणेच हे क्रूझ आहे. फिनलँड मधील तुरकू येथे या क्रुझची निर्मिती करण्यात आली असून त्यासाठी तब्बल ९०० दिवसांचा कालावधी लागला आहे. हे क्रूझ आयफेल टॉवरएवढे उंच असून त्याच्यावर २० डेक आहेत. जरी सध्या या क्रूझची क्षमता ५,६०० असली तरी ती ७५०० पर्यंत वाढवता येऊ शकते. याशिवाय २३०० कर्मचाऱ्यांची व्यवस्था सुद्धा या क्रुझवर करण्यात आली आहे.
क्रुझवर सहा स्विमिंग पूल असून पर्यटकांसाठी इतरही काही आकर्षणाचे बिंदू आहेत. त्यामध्ये १६ संगीतकार आणि ५० पेक्षा इतर कलाकारांचीही व्यवस्था पर्यटकांच्या मनोरंजनासाठी करण्यात आली आहे. हे क्रूझ बांधण्यासाठी तब्बल दोन अब्ज डॉलर्स खर्च आला आहे. गेल्या शनिवारी फुटबॉल स्टार लिओनिल मेस्सी याच्या हस्ते या क्रूझचा प्रवास सुरू करण्यात आला.