इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चंदीगडः चंदीगड महापौर निवडणुकीत ‘आप’-काँग्रेस आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मनोजकुमार सोनकर विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी आलेला हा निकाल ‘इंडिया’ आघाडीसाठी धक्का मानला जात आहे. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांची व्यूहरचना पुन्हा एकदा यशस्वी झाली आहे. त्यांनी भाजपचा महापौर निवडून आणला.
भाजपच्या मनोज कुमार यांना १६ मते मिळाली, तर ‘आप’चे उमेदवार कुलदीप कुमार यांना १२ मते मिळाली. आठ मते रद्द झाली. निकालाबाबत भाजपवर हेराफेरीचा आरोप करण्यात आला आहे. ‘आप’चे नगरसेवक कमलप्रीत सांगितले की, आठ मते रद्द करण्यात आली; परंतु ती रद्द झाली हे सांगितले नाही. सुरुवातीला महापौरपदासाठी मतदान झाले होते. महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आम आदमी पक्ष’ (आप) आणि काँग्रेसने युती केली होती. करारानुसार, ‘आप’ने महापौरपदासाठी उमेदवार उभा केला होता, तर काँग्रेसने उपमहापौर आणि उमेदवार उभा केला होता.
चंदीगड महापौर निवडणुकीसाठी १८ जानेवारी रोजी मतदान होणार होते; परंतु पीठासीन अधिकारी आजारी पडल्याने चंदीगड प्रशासनाने ते ६ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलले होते. याविरोधात ‘आम आदमी पक्षा’ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. निवडणूक पुढे ढकलण्याच्या प्रशासनाच्या आदेशाला काँग्रेस आणि ‘आप’च्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला होता. कडेकोट बंदोबस्तात ३० जानेवारी रोजी मतदान घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते.