इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हुतात्मा दिन आणि कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांच्या स्मृतिदिनी जल-जंगल-जमीन-रेशन-रोजगार- शिक्षण या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मूलभूत समस्या घेऊन मुंबई-अहमदाबाद हायवे वरील चारोटी नाका येथे आज तब्बल ३०,००० लोकांनी एक तासभर जबरदस्त रस्ता रोको आंदोलन केले.
पिढ्यानपिढ्या वाट पाहूनही शेतकऱ्यांच्या नावावर न झालेल्या जमिनी त्वरित त्यांच्या नावावर करा, वाढवण बंदर, नदीजोड प्रकल्प, एसईझेड हे सगळे पर्यावरण आणि जनतेच्या जीवावर उठलेले प्रकल्प रद्द करा, इतर प्रकल्पांसाठी जबरदस्तीने बळकावलेल्या जमिनीचा कसणाऱ्या शेतकऱ्यांना १०० टक्के मोबदला द्या, वाढलेल्या इष्टांकानुसार सर्व गरजूंना पुरेसे रेशन वेळच्या वेळी द्या, मागेल त्या गरजूला घरकुल द्या, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची होणारी हेळसांड थांबवा, विजेची भरमसाठ बिले आणि कोर्टाच्या नोटिसा देणे बंद करा अशा अगदी रोजच्या जगण्यातील मागण्या घेऊन हे ३० हजाराहून अधिक महिला, पुरुष, युवा, विद्यार्थी कडक उन्हात चारोटी नाक्यावर बसून होते.
यापूर्वी अनेक आंदोलने करून, सरकारने त्या त्या वेळी दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवूनही जनतेच्या पदरात काहीही न पडल्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा, सीटू, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच या सर्व संघटनांनी हे जबरदस्त आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
तब्बल तासभर हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग बंद पाडल्यावर सरकारला जाग आली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यातील मुख्य प्रश्न दोन महिन्यांत कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावण्याचे दिलेले लेखी पत्र डहाणू आणि तलासरीच्या तहसीलदारांनी वाचून दाखविले.
चर्चेअंती गायरान, देवस्थान, वरकस आणि इनामी जमिनीची ताबडतोब प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन पाहणी करण्यात येईल, या पाहणीनुसार जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात येईल, रेशनच्या सर्व प्रश्नांवर पुरवठा अधिकारी जातीने लक्ष घालतील, घरकुल मंजुरीची प्रक्रिया लवकर सुरू होईल अशा अनेक मागण्या मान्य करण्यात आल्यावरच लोकांनी हा राष्ट्रीय महामार्ग मोकळा केला.
आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे पॉलिट ब्यूरो सदस्य आणि किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, पक्षाचे राज्य सेक्रेटरी व केंद्रीय कमिटी सदस्य डॉ. उदय नारकर, पक्षाच्या केंद्रीय कमिटी सदस्य व जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, राज्य सचिवमंडळ सदस्य आमदार विनोद निकोले, किसन गुजर, जिल्हा सेक्रेटरी किरण गहला, तसेच रडका कलांगडा, लक्ष्मण डोंबरे, चंदू धांगडा, भरत वळंबा, यशवंत बुधर, अमृत भावर, सुनील सुर्वे, रामू पागी, लहानी दौडा, प्राची हातिवलेकर, नंदू हाडळ, भास्कर म्हसे, या नेत्यांनी केले.
सर्व नेत्यांनी आपल्या भाषणांत जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर न करणे हा केंद्र सरकारच्या कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणाचा भाग आहे, गरीब शेतकऱ्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवू नये म्हणून त्यांच्यात जात, पात, धर्माच्या नावावर फूट पाडून पोटापाण्याच्या मूळ प्रश्नापासून त्यांचे लक्ष विचलित केले जात आहे, सबंध देश अदानी आणि अंबानीच्या घशात घालून जनतेला रस्त्यावर आणणाऱ्या या भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारचा येत्या निवणुकीमध्ये जोरदार पराभव करण्याचे आवाहन केले.
मान्य झालेल्या सर्व मागण्यांचा पाठपुरावा करण्याचा आणि इतर मागण्या मान्य होईपर्यंत आपला लढा जोरदारपणे पुढे सुरू ठेवण्याचा जबरदस्त निर्धार करून गोदावरी व शामराव परुळेकर अमर रहे, बिरसा मुंडा अमर रहे, जनविरोधी, धर्मांध मोदी सरकार चले जाव, जल-जंगल-जमीन-रेशन-पाणी- रोजगार आमच्या हक्काचं, लडेंगे- जीतेंगे अशा घोषणांच्या दणदणाटात या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.